पान:विवेकानंद.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीयं


आहे असा प्रत्यय माझ्या अंतरंगांत वाणला, तर त्याच माझ्या प्रेमाला पूर्णत्व प्राप्त होते; आणि मग त्या ठिकाणीं दुःखाचें वारेंही संभवत नाहीं. अशाच रीतीनें विश्वांतून एखादी वस्तु निराळी करून तिचें आत्मरूप संकुचित करून- तिजवर तुम्ही प्रेम करतां त्यावेळी त्या तुमच्या क्रियेला पुढे होणाऱ्या प्रतिक्रियेची तयारीच तुम्ही करीत असतां. ज्या ज्या पदार्थाचें आत्मरूप आपण संकुचित करूं पाहतों, तो तो प्रत्येक पदार्थ आपल्या या क्रियेला प्रतिक्रिया करतो आणि यामुळे त्या पदार्थातून आपणांस दुःखाची आणि संकटाची प्राप्ति होते. जर सर्व पदार्थ आत्मरूप आहेत असें जाणून आत्मरूपानें त्यांजवर आपण प्रेम केलें, तर त्यांतून प्रतिक्रियेची- दुःखाची - उत्पत्ति होणे शक्यच नाहीं. पूर्णानंद- पूर्ण सुखरूपता - ती हीच.
 या कल्पनातीत स्थितीला पोहोचणे शक्य आहे काय ? या स्थितीला पोहों- चावयास कांहीं मार्ग आहे काय ? होय. श्री याज्ञवल्क्यांनी हा मार्गही सुप्रका- शित करून ठेविला आहे. विश्व अनंत आहे. त्याच्यांतील प्रत्येक वस्तूंत आत्मरूप पाहावयाचें ही गोष्ट खरी; पण प्रथम आत्मरूपाचीच ओळख नसेल, तर तें इतर वस्तूंत तरी कोठून दिसेल ? ' लांब अंतरावर एखादा ढोल वाजत असला आणि त्याचा नाद बंद करण्याची इच्छा आपणास झाली, तर हवेवरून वाहत येणारे नादतरंग बंद करून त्याचा नाद बंद करणें आपणास शक्य नाहीं; परंतु आपण त्या ढोलाजवळ गेलों व त्यावर हात ठेविला, तर त्याचा नाद तावडतोब बंद पडेल. एखादा शंख वाजत असला, तर शंखाजवळ जाऊन त्याच्या मुखाला हात लावल्याशिवाय त्याचें वाजणें बंद करतां येत नाहीं. एखादा वीणा वाजत असला, तर त्याच्याजवळ जाऊन त्याच्या तारां- वर हात ठेवला पाहिजे. ओलसर सर्पण जळत असले ह्मणजे त्यांतून धूर आणि नानाप्रकारचे स्फुलिंग बाहेर पडत असतात. त्याचप्रमाणे त्या मोठ्या एकांतून इतिहास आणि अनेक प्रकारच्या विद्या बाहेर पडल्या आहेत. सर्व पाण्याचा शेवटचा मुक्काम समुद्र हाच; स्पर्शज्ञानाचे अधिष्ठान हात हेंच, गंधज्ञानाचें अधिष्ठान नाक; रसज्ञानाचें अधिष्ठान जीभ, रूपज्ञानाचें अधिष्ठान डोळे; शब्दज्ञानाचे अधिष्ठान कान; संकल्पविकल्पांचें अधिष्ठान मन; सर्व विद्यांचें अधिष्टान हृदय; क्रियेचें अधिष्टान हात; भाषेचें अधिष्ठान जीभ, समुद्राच्या पाण्यांत मीठ ओतप्रोत भरलें असतांही ते दिसत नाहीं; त्याच-