पान:विवेकानंद.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ४ थे.

१५९


उपयुक्त असे कांहीं कार्य होईल काय ?" असेही प्रश्न कोणीकोणी विचारतात; पण अशा स्थितीत हे प्रश्न संभवतच नाहींत. एखादा लहान मुलगा उद्या असेंहीं ह्मणेल, की “मी मोठा झाल्यावर माझ्या खाऊचे काय होईल ? माझ्या खेळावयाच्या गोट्यांचे काय होईल ? मी मोठी झाले तर माझ्या बाहुल्यांचे कसे होईल ? याकरितां मी मोठी होणारच नाहीं. जगाबद्दल नुकतेच सांगितलेले प्रश्न याच मासल्याचे आहेत. जगाला वस्तुतः पूर्वी अस्तित्व नव्हते, सध्यां नाहीं, आणि पुढेही कधी असणार नाहीं. आत्म्याचे वास्तविक स्वरूप कसे आहे हे आपण जाणले, तर सर्वत्र केवळ आत्मरूपच आहे असे आपल्या प्रत्ययाला येईल. जगांत दिसणारे अनेक आकार हे स्वप्नांतील वस्तूंसारखे असून, त्यांस वास्तविक अस्तित्व नाहीं असा प्रत्यय आल्यानंतर, जगांतील दुःखें, आपत्ती, दुष्टपणा अथवा चांगुलपणा, यांचा कोणताच परिणाम आपणावर होणार नाही. जर या अनंत वस्तूंना आस्तित्वच नाहीं असे दिसून आले, तर त्यांत बरे आणि वाईट ही निवड तरी कोणी आणि कशी करावी ? ज्ञानयोग्यांनी जे कांहीं आपणांस शिकविले आहे ते हेच. यासाठी निधड्या छातीने पुढे सरा आणि मुक्त व्हा, आपली बुद्धि खंबीर करून, तिने दाखविलेल्या मार्गाने पुढे पाऊल टाका. ज्ञानमार्ग सोपा नाही. त्यावर आरूढ होणाराला • लोखंडाचे चणे खावे लागतात. नामरूपाचा भंग करून जो पुढे सरेल, त्यालाच ज्ञानप्राप्ति होईल. केवळ शूरालाच ज्ञानमार्गावर आरूढ होणे शक्य आहे. इंद्रियांच्या आणि बुद्धीच्याही ताब्यात राहून ज्ञान मिळविणे शक्य नाही. या दोहोंच्याही बाहेर गेल्यानंतर ती तुह्मांस सांपडेल.
 हें स्थूल शरीर म्हणजे 'मी' नव्हे; याकरितां या शरिराबद्दलचे सर्व विचार सोडून दिले पाहिजेत. अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी ऐकून अनेक लोक भांबावून जातात आणि विलक्षण प्रश्न विचारू लागतात. एक म्हणतो, ‘हें सारे ज्ञान मला तंतोतंत पंटले; 'मी' म्हणजे शरीर नव्हे हेही मला समजलें; पण माझे डोके अजून तसेच दुखते, ते अद्यापि थांबले नाही.' जर आपल्या सगळ्या शरिरालाच अस्तित्व नाही, तर डोकेंतरी कोठून आलें ? त्याला तरी अस्तित्व कसे असेल १ हजारों देह आणि डोकीं जातात व येतात. त्यांचे आम्हांस काय ?