पान:विवेकानंद.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

याचें कारण काय ? पुरुषाच्या करमणुकीकरितां व कल्याणाकरितां हे सर्व खेळ ती करीत आहे हे सर्व खेळ पाहून पुरुषाने स्वतःचें पूर्णत्व ओळखावें, हाच तिचा उद्देश आहे. हा सर्व विश्वरूप ग्रंथ प्रकृतीनें लिहिला आहे. पुरुषानें हा ग्रंथ वाचावा आणि सर्वद्रष्टा व सर्वशक्तिमान् व्हावें इतकाच तिचा हेतु आहे. वस्तुतः तो सर्वद्रष्टा आणि सर्वशक्तिमान् असा आहेच; पण ही ओळख तो विसरला आहे. ही स्वतःची ओळख त्याला पटावी हा प्रकृतीचा उद्देश आहे. यासाठींच हा विश्वग्रंथ तिनें निर्माण केला आहे. आतां तुम्हांला एक मुद्द्याची गोष्ट येथे सांगणे इष्ट आहे; ती ही कीं, परमेश्वराच्या अस्तित्वासंबंधी जी तुमची कल्पना आहे, ती आमच्या आर्यतत्त्ववेत्त्यांस मान्य नाहीं. परमेश्वर हा या सर्व विश्वाचा उत्पन्नकर्ता आहे अशी तुमची समजूत आहे. ही कल्पना आद्यं दर्शनकार श्रीकपिल यांस मान्य नाहीं. विश्वनिर्माणकर्त्या परमेश्वराचें अस्ति- त्वच त्यांस मान्य नाहीं. विश्वाचा एकटा निर्माणकर्ता असा व्यक्तिविशिष्ट पर मेश्वर आहे असे मानण्याची जरुरीच नाहीं असे त्यांचें मत आहे. हे सर्व कार्य करण्यास प्रकृतीच समर्थ आहे. परमेश्वराने अनेक प्रकारच्या वस्तू जमविल्या आणि त्यांचे विश्व निर्माण केलें, ही कल्पना सर्वथैव त्याज्य आहे असे त्यांचें म्हणणे आहे. कांहीं कारण नसतां परमेश्वरानें उठावें आणि हें विश्व निर्माण करण्याचा धंदा करावा, ही कल्पना अत्यंत पोरकट आहे- पोरकटपणाची ही अगदर्दी कमाल आहे. विश्वबाह्य परमेश्वराची कल्पना कपिलमुनींना मान्य नसली, तरी ते शुद्ध निरीश्वरवादीही नाहींत हैं लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे. परमेश्वराचें अस्तित्व त्यांस मान्य आहे; पण त्याबद्दलची त्यांची उपपत्ति निराळी आहे. त्यांचे म्हणणें असें आहे कीं, आपण सर्व मुक्त होण्याकरितां खटपट करीत आहों; आणि जो मनुष्य मुक्त होतो, तो, त्याची इच्छा असल्यास त्या चालू कल्पापुरता प्रकृतीशीं तादात्म्य पावून राहतो; व नव्या कल्पाच्या वेळीं सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान् या रूपानें अवतरतो आणि विश्वाचा शास्ताही होतो. त्या कल्पापुरतें विश्वनियमनाचें कार्य त्याजकडे येतें. या दृष्टीने त्याला विश्वनियामक परमेश्वर असें पाहिजे तर म्हणावें. अशा रीतीनें तुमच्या- आमच्यासारख्या सामान्य मनुष्यासही कालेंकरून परमेश्वरत्व प्राप्त होईल. अशा रीतीनें प्रत्येक कल्पाला परमेश्वर निराळा असतो, आणि ईश्वरत्व ही चिरकाल टिकणारी स्थिति नाहीं, असें श्रीकपिलांचें ह्मणणे आहे. चिरकाल