पान:विवेकानंद.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.
सांख्यदर्शन - प्रकरण १ लें.

९७

परमाणूंची उत्पत्ति होऊं लागते; नंतर या परमाणूंपैकी कित्येकांचा संयोग होऊन त्यांतून अणू निर्माण होतात. या अणूंपासूनच पुढें विश्वांतील सर्व जंडपदार्थांची उत्पत्ति झाली आहे.
 विश्वोत्पत्तीसंबंधींच्या या श्रुतिवचनांचें इंग्रजी भाषांतर पुष्कळांनी कांहीं विलक्षण प्रकारचें केलें आहे. प्राचीन आर्यतत्त्ववेत्त्यांचें हृद्भुत यांस ठाऊक नसतें. अधिकारी पुरुषांनी लिहिलेलीं भाष्ये यांनी पाहिलेली नसतात. भाषां- तर करतांना भाष्यांचे साहाय्य हे घेत नाहीत, आणि स्वतःच रहस्य जाण- ण्याची पात्रता तर यांच्या आंगी नसते. 'वायु' 'तेज' इत्यादि शब्दांचीं भाषांतरें ते 'हवा' 'विस्तव' या लौकिक अर्थाच्या इंग्रजी शब्दांनीं करतात. मूळ संहितेवरील भाष्य त्यांनी पाहिले असतें तर बरोबर अर्थ त्यांच्या लक्ष्यांत आला असता. प्राणाचा आघात आकाशावर होऊं लागला म्हणजे त्या योगानें तें स्पंद पावूं लागतें. या स्पंदांस वायु असे नांव आहे. आकाश- स्पंद हेंच वायूचें म्हणजे हालचालीचे पहिलें स्वरूप. या वायुरूपांतून पुढे विरल स्वरूपाचे जडपदार्थ निर्माण होतात. पाण्याची वाफ अत्यंत उष्ण असली म्हणजे तिला दृश्यरूप नसतें, पण तीच थंड होऊं लागली म्हणजे तिच्यांतील अणूंचें घनीभवन होऊन ती दिसूं लागते; तथापि या स्थितींत ती दिसत असली तरी तिचे अणू विरल असतात. त्याचप्रमाणे आकाशावर प्रथम सूक्ष्म स्पंद उमटतात; व नंतर त्यांचें घनीभवन होऊं लागून त्यांतून विरल स्वरूपाचे जडपदार्थांचे अणू निर्माण होतात. आकाशस्पंद अधिक झपाटयाचे होऊँ लागले म्हणजे त्यामुळे जी उष्णता उत्पन्न होते तिला तेज असें नांव आहे. यानंतर विरल स्वरूपाचीं जडद्रव्यें हळुहळू थंडावत जाऊन प्रवाही स्वरूपाची होतात. या प्रवाहरूप जड अणूंस आप असे नांव आहे. हेच अणू अधिक घनीभूत झाले ह्मणजे ते अधिक घट्ट होतात; या त्यांच्या स्वरूपास पृथ्वी असें नांव आहे. ज्याप्रमाणें अदृश्य स्थितीतील वाफेचें घनीभवन झाले ह्मणजे तींतून प्रवाही पाणी निर्माण होतें व त्याच पाण्याच्या अधिक घनीभवनानें त्याचें बर्फ होतें, त्याचप्रमाणे आकाशाची रूपें बदलत बदलत पृथ्वीच्या घनरूपापर्यंत तें पोहोचतें. प्रथम केवळ आकाशतत्त्व असतें. तें स्पंदरूप झालें ह्मणजे वायु निर्माण होतो. या स्पंदांमुळे जी उष्णता उत्पन्न होते, तें तेज; तेजानंतर आकाश प्रवाही होतें, तें आप; आणि तें अधिक घट्ट झालें
 स्वा. वि. खं. ३-७,