पान:विधिलिखित - महाराष्ट्रातील सिंचन कायदे.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखकाचे मनोगत
वाल्मीत २८ वर्षे सिंचनविश्वाशी संबंध आला. त्यामूळे सिंचनाविषयी थोडंफार कळायला लागलं. सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, पाणी वापर संस्थांचे सदस्य व पदाधिकारी, कालवा निरीक्षक, दफ्तर कारकून व मोजणीदार आणि शाखा अभियंत्यांपासून जलसंपदा विभागाच्या सर्व स्तरांवरील अभियंते यांना जलव्यवस्थापनाचे प्रशिक्षण देताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. या पुस्तिकेत जे काही आहे ते खरेतर वाल्मीसह या सर्वांचे आहे. शब्दांकन तेवढे माझे.
 वाल्मीतून निवृत्त झाल्यावर “आधुनिक किसान" या साप्ताहिकात वर्षभर स्तंभलेखन (लाभक्षेत्रे - कुरुक्षेत्रे) करण्याची संधी त्या साप्ताहिकाचे संपादक श्री. निशिकांत भालेराव यांच्यामुळे मिळाली. त्यातील विधिलिखित या भागातील लेख या पुस्तिकेत आहेत.
 मानवलोक संस्थेच्या डॉ. द्वारकादासजी व श्री. अनिकेत लोहियांमुळे ही पुस्तिका प्रकाशित होते आहे. मी या सर्वांचा आभारी आहे.
 सिंचन कायद्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून गेली २०-२५ वर्षे मला शक्य ते सर्व प्रयत्न करतो आहे. लेख, शासन दरबारी पत्रव्यवहार, ई- मेल मोहिम, उपोषण सगळं झालं. परिणाम ? शुन्य ! बंद दरवाजावर धडका देणे चालू आहे. ही पुस्तिका हा अजून एक प्रयत्न. एवढेच ! बघुयात, दारे किलकिली तरी होतात का !!
 रामशास्त्री प्रभुण्यांच्या “पुरोगामी” महाराष्ट्रात नवनवीन जल-कायदे येत आहेत. अंमलबजावणी ? पुढचे पाठ मागचे सपाट अशी एकूण परिस्थिती आहे. 'पाणी मिळणारे' आणि 'पाणी न मिळणारे' अशा दोन समुहात महाराष्ट्राची विभागणी झाली आहे. पाण्यावरून होणारे तिसरे महायुध्द राज्यात खरं तर सुरू होऊन जमाना झाला आहे. टँकरची जागा टँक ( रणगाडा) कधी घेईल हे सांगता येत नाही.
‘बघा, मी सांगत होतो' असे म्हणण्या पलीकडे एक मध्यमवर्गीय दुसरं करणार तरी काय ?
असो.
धन्यवाद.
‘पाणी न मिळणाऱ्यांना’ शुभेच्छा !
(ii)

• प्रदीप पुरंदरे

-