पान:विधिलिखित - महाराष्ट्रातील सिंचन कायदे.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकाशकाचे मनोगत

 पाणी हे जीवन आहे ! हे जरी खरे असले तरी अलिकडच्या काळात पाण्याला संघर्षाचे रूप येऊ लागले आहे. हे चित्र हळूहळू सर्व जगाला वेढा घालणार असे दिसते. पाणी आता मौल्यवान ठरत आहे. पाणी ही विकाऊ वस्तू समजली जात आहे. महाराष्ट्र राज्याने २००५ साली राज्यातील जलसंपत्तीचे नियमन करण्याकरिता केलेल्या कायद्यावरून हे सहज लक्षात येते.

 याचा अर्थ असा की, या पुढच्या काळात पाणी वापराचे नियम लक्षात ठेऊनच पाण्याचा वापर करावा लागेल. महाराष्ट्रातील जलसंपत्तीचे कुशल, समन्यायी व शाश्वत व्यवस्थापन करण्याकरिता जलसंपत्ती विषयक सर्व कायदे सामान्य शेतकऱ्यांनाही समजावून घ्यावे लागतील.

 राज्याने जलसंपत्ती नियमनाचे अनेक कायदे केले परंतु अंमलबजावणी मात्र फारच तोकडी आहे. सिंचन क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व संस्थांना कायद्याची माहिती व्हावी यासाठी मानवलोक ही पुस्तिका प्रकाशित करत आहे.

 प्रा. प्रदीप पुरंदरे हे जल व भूमि व्यवस्थापन (वाल्मी) या शासकीय संस्थेतून निवृत्त झालेले प्राध्यापक आहेत. पाणी क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. या पुस्तिकेत त्यांनी केलेले महाराष्ट्रातील सिंचन कायद्यांचे विवेचन दिले आहे. जल आणि सिंचन क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना ते उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो.

- अनिकेत लोहिया

कार्यवाह - मानवलोक

(i)