पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


निराळी योजना करावी लागते; त्यासंबंधीं माहिती या पुस्तकांचे दुस-या भागांत देण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे रंगीबेरंगी कापडाची माहिती त्या भागांत सविस्तर देण्यांत येईल.
 हें प्रकरण संपविण्यापूर्वी आम्ही पुन्हां एकदां सांगतों कीं, स्वतंत्रता पाहिजे म्हणून हा धंदा हलगर्जीपणानें आरंभ करून एक एक काम पूर्ण शिकल्याशिवाय कापड विणूं लागण्याची घाई करतां कामा नये. असें केल्यानें घोटाळा होती व नसत्या अडचणी उत्पन्न होऊन कामाचा वीट येतो व धंदा जिकिरीचा आहे म्हणून सोडून द्यावा लागतो. ही गोष्ट मनांत ठेवून प्रत्येक कार्य आम्हीं या पुस्तकांत सांगितल्याप्रमाणें व्यवस्थित रीतीनें करावें म्हणजे कंटाळा न येतां विणकाम चांगलें येऊं लागेल व हें पुस्तक लिहिण्याचा आमचा उद्देश सफळ होईल.
 हें पुस्तक आम्हांला अवगत असलेल्या हिंदी, कानडी, गुजराथी वगैरे भाषांत तयार करण्याबद्दल पुष्कळ लोकांचा आग्रह आहे; परंतु गुजराथी व मराठी खेरीज इतर देशी भाषांचे छापखाने मुंबईस नाहीत, सबब फक्त गुजराथी व फारतर हिंदी पुस्तक लवकर तयार होणें शक्य आहे. इतर भाषांत पुस्तकें त्या त्या प्रांतांमध्येंच तयार करणें शक्य असतें, म्हणून त्याबद्दल खात्री देतां येत नाही; तरी खटपट चालू आहे.