पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९५)

भावनाच नष्ट करून टाकल्यानंतर म्हणजे देह व आत्मा या दोन्ही दृष्टीने 'मी' निखालस नाहीसा झाल्यानंतर 'मला' सुख मिळणार आहे असे धर्म सांगतो. मोक्ष जरी क्षणभर खरा मानला तरी ही सुखाची कल्पना मोठी अजब वाटते. सुख भोगणाराच नाहीसा झाला, म्हणजे त्याला सुख लागेल असे हे उत्तर आहे. आकाशातल्या ताऱ्याकडे पहाण्यात आपण दंग होऊन गेलो असलो, किंवा गायनाच्या लकेरीनी आनंदून गेलो असलो तर त्यावेळी क्षणभर देहभान विसरतो (असे म्हणतात). पण त्या क्षणी मी हे सुख अनुभवीत आहे, ही जाणीव स्पष्ट असते. आणि म्हणूनच तसले सुख तू घे असे कोणी सांगितले तर त्यात कांही विचित्र वाटत नाही. मला सुख हवे असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा इतरांहून निराळे असे जे माझे व्यक्तित्व ते ठेवूनच, म्हणजे देह, आत्मा व मन हे निराळे ठेवूनच मला सुख हवे असा माझ्या म्हणण्याचा आशय असतो. पण हे व्यक्तित्वच तू नाहीसे कर म्हणजे तुला (?) सुख लागेल लागेल असे धर्म सांगतो. धर्माचे हे सुख माझ्या देहालाही नाही, मनालाही नाही व आत्म्याला तर सुतराम् नाही. कारण तो पूर्ण विलीन झाला, निराळेपणा अगदी नाहीसा झाला म्हणजेच मोक्षसुखाला सुरुवात होत असते. यातना असह्य झाल्या म्हणजे मनुष्य आत्महत्या करतो, त्यांत जी प्रवृत्ती असते तीच मोक्षांत आहे. आत्महत्या केली तरी देहच फक्त जातो, आत्मा तसाच रहातो अशी कोणाची तरी कल्पना झाल्यामुळे तोही नाहीसा करून टाकण्याची युक्ती त्याने सांगितली. व ती म्हणजेच मोक्ष होय. मोक्ष हा आत्यंतिक नाश आहे. त्याखेरीज दुसरे काही नाही. बुद्धाचे निर्वाण म्हणजे हेच. आणि भाषेत थोडाफार फरक केला तरी तेवढ्यावरून मोक्ष, निर्वाण व आत्यंतिक नाश यांत फरक आहे असे म्हणता येणार नाही. पूर्ण नाशाहून मोक्षस्थिती कांही निराळी आहे, असे सिद्ध करण्यासाठी काही साधुपुरुषांचे ब्राह्मी स्थितीचे अनुभव सांगितले जातात. पण एक तर हे अनुभव सर्वांचे सारखे नसतात. ती स्थिती म्हणजेच मोक्ष असे म्हणण्यास काहीच पुरावा नाही. समाधीतून परत आल्यानंतर त्या स्थितीची आठवण राहाते व त्यावरून ती स्थिती नाशापेक्षा निराळी आहे हे जाणता येते. हे जरी क्षणभर कबूल केले तरी साध्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याला प्राप्त होणारी अवस्था व या समाधीवाल्याच्या मृत्यूनंतर त्याला प्राप्त होणारी