पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९४)

शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुख श्रेष्ठ म्हणतात त्याचे कारण हेच आहे. सामाजिक दृष्टीने त्याची आणखीही काही कारणे आहेत. पण व्यक्तीच्या दृष्टीने पाहिले तर शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुख श्रेष्ठ असे म्हणण्याचे कारण इतकेच की ते दीर्घकाल टिकते. व त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. आहार निद्रा, मैथुन या सुखाचे सुखत्व फारच थोड्या काळात नष्ट होते. गोड खाण्यांचा कंटाळा आपणास अर्ध्या तासाच्या आतच येतो. निद्रा ही विश्रांती पुरी झाल्यावर सुखद होऊ शकत नाही. पण मानसिक सुखांचे तसे नाही. वाचन, लेखन, सृष्टीच्या नियमांचा अभ्यास, गूढ प्रश्नांवर चितन यांचा आनंद, ज्याला त्याची गोडी लागली आहे, तो मनुष्य वर्षानुवर्षे अखंड घेऊ शकतो. शारीर सुखाची मर्यादा थोडी जरी ओलांडली तरी व्याधी जडतात. ती भीती मानसिक सुखात नाही. शारीरिक सुखाच्या मानाने मानसिक सुख भोगण्याची आपल्या ठायी असलेली शक्ती अमर्याद आहे असे म्हटले तरी चालेल. आणि म्हणूनच ते सुख श्रेष्ठ असे आपण म्हणतो धर्माची पायरी याच्या पुढची आहे. ब्रह्मात विलीन झालास म्हणजे तुला कायमचे सुख, शाश्वत सुख मिळेल एवढेच धर्माला सांगावयाचे आहे. आणि ते खरे असेल तर व्यक्तीच्या दृष्टीने मोक्ष हे परमोच्च साध्य होय यात शंका नाही आणि म्हणूनच मोक्षसुख किंवा आध्यात्मिक सुख असे ज्याला म्हणतात त्यांचे स्वरूप काय आहे, व त्याच्याही अगोदर तसा काही प्रकार शक्य आहे, का तो उगीचच एक भ्रम आहे, याचा विचार आपणास केला पाहिजे.
 हे जग सोडून, जिवलगांचे संबंध तोडूनही तुम्ही मोक्षाच्या मागे लागा, असे जेव्हा धर्म सांगतो, तेव्हां त्यामुळे तुम्हाला कायमचे सुख प्राप्त होईल असे आश्वासन तो देत असतो. पण मोक्षाच्या स्वरूपाचे जे वर्णन करण्यात येते ते पाहिले तर ते 'मला सुख मिळावे' हा जो मानवाचा हेतू व 'तुला सुख मिळेल' हे जे धर्माचे आश्वासन त्यांशी अगदी विसंगत आहे असे ध्यानांत येईल. मनुष्य म्हणतो 'मला सुख पाहिजे' धर्म म्हणतो हे मला मान्य आहे. आणि येवढ्यासाठीच अत्यंत श्रेष्ठ व कायम टिकणारे सुख मिळविण्याचा मार्ग मी तुला सांगतो. तो कोणचा ? तर 'त नाहीसे होणे' हा मोक्ष म्हणजे दुसरे काय आहे ? आत्मा ब्राह्मात विलीन करून टाकावयाचा. देह तर सोडावयाचाच; पण मी ही जाणीवही नष्ट करून टाकावयाची. आणि मी ही