पान:विचार सौंदर्य.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५० 

विचार सौंदर्य


कोणी सांगितलें तर मी 'हास्योत्पादक गोष्टीचें प्रेमगर्भ व खेळकर वृत्तीनें केलेलें चिंतन ' असें करीन.

 या दृष्टीनें पाहतां केळकरांनीं पृष्ठ १२८ मध्यें हॉब्स (Hobbes) याची 'लाघवी 'संज्ञक जी हास्यमीमांसा दिली आहे ती एकांगी आहे हें ध्यानांत येईल. " हॉब्स याचें म्हणणें असें आहे कीं, आपल्याला जें हंसूं येतें तें आपल्या मनांत पर-सापेक्ष अशा श्रेष्ठपणाची कल्पना एकदम येऊन क्षणिक अहंकारवैभव प्रकट होतें त्यामुळे होय." दुसऱ्याची कुचेष्टा करून स्वतःची प्रतिष्ठा स्वतःजवळ वाढवून घेणें हेंच विनोदाचें रहस्य होय. अशा रीतीनें हॉब्सचे म्हणणें थोडक्यांत मांडतां येईल. हें मत केळकरांना पसंत नाहीं, हें वरील विवेचनावरून दिसून येईलच, पण त्यांतील चुकी जितक्या स्पष्टतेनें दाखवावयास पाहिजे होती व 'खऱ्या व अस्सल' विनोदाची मांडणी जितक्या उठावदार रीतीने करावयास पाहिजे होती तितकी केळकरांनी केलेली नाहीं, हें कबूल केले पाहिजे.

 केळकरांनीं हास्याबद्दल इंद्रियविज्ञानशास्त्रदृष्टया व इतर दृष्टींनीं ज्याप्रमाणें विवेचन केले आहे, त्याचप्रमाणे विनोदबुद्धीचा व्यावहारिक उपयोग, हास्यविनोदाच्या व्यावहारिक मर्यादा, इत्यादि अनेक मनोरंजक प्रश्नांसंबंधीं विवेचन केलेले आहे.

 संस्कृतीच्या वाढीबरोबर काव्य मागें पडतें कीं काय, यासंबंधी व इतर साहित्यविषयक प्रश्नांसंबंधी, त्याचप्रमाणे त्यांच्या अनेक ग्रंथपरीक्षणांत जे अनेक प्रश्न उत्पन्न झालेले आहेत त्यासंबंधानें उल्लेखहि न करतां त्यांची रजा घेतों. पण रजा घेण्यापूर्वी परीक्षणकार या नात्यानें त्यांच्याबद्दल माझ्या ज्या प्रेमाच्या तक्रारी आहेत त्या सांगतों. पहिली तक्रार अशी कीं, ते फारच समतोलबुद्धीनें लिहितात, एकांगित्व किंवा आत्यंतिकत्व त्यांत नसतें, आणि म्हणून परीक्षणकाराचें काम अवघड होतें ! प्रतिपक्षीयाला जेवढें कांहीं म्हणतां येण्यासारखे आहे तें सगळे केळकर आर्धीच म्हणून टाकतात आणि टीकाकाराला टीका करण्यास फारशी जागा ठेवीत नाहींत. याचें एक गमक म्हणजे त्यांच्या भाषाशैलीचा एक लहानसा विशेष सांगतां येईल ! त्यांची पुष्कळशीं वाक्यें 'अमुक झालें तरी', 'अमका झाला तरी ', ' अमुक असले तरी' अशा तऱ्हेनें आरंभ