पान:विचारसौंदर्य.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अलीकडे महाकाव्ये कां निर्माण होत नाहीत?

कित्येकांना असे वाटते की ज्ञान फार वाढल्यामुळे ( --'अक्कल फार' वाढल्यामुळे म्हणा पाहिजे तर!) कवित्व अशक्यप्राय होत चालले आहे, अर्थात् महाकाव्य सुतराम् अशक्यप्राय झाले आहे. मेकॉलेने मिल्टनवरील आपल्या सुप्र- सिद्ध निबंधांत संस्कृतीच्या प्रगतीबरोबर कवित्वाची परागति होते असे प्रमेय मांडलें व ते काही लोकांना प्रथमदर्शनी खरे दिसले. पण बारकाईने विचार केल्यावर आधिभौतिक काय, आध्यात्मिक काय, किंवा कोणत्याहि काय, ज्ञानाचा व कवि- त्वाचा 'अहि-नकुलवत् ' किंवा 'तमः प्रकाशवत् ' विरोध आहे हे खरे दिसत नाही. ज्ञानाने असे काय केले आहे की, त्यामुळे कवित्वाने त्यापासून भिऊन चार पावले दूर असावे ? ज्ञानाच्या उष्णतेने कवित्व करपते, ज्ञानाच्या प्रखर प्रकाशांत कवित्वाचे डोळे दिपतात, इत्यादि प्रकारची अलंकारिक भाषा तर्कशुद्ध प्रमाणाची योग्यता पाहू शकत नाही. कवितादेवीला शब्दचित्रलेखनाकरितां व इतर वाग्विलासाकरितां वर्ण्य विषय म्हणून चंद्रिकायुक्त किंवा अंधकारमग्न रात्र प्रिय असते. मनुष्यजातीच्या किंवा व्यक्तीच्या अज्ञानान्धकारांतच तिला वाचा फुटते, किंवा तिची वाणी मधुरता धारण करते असे का म्हणावयाचे आहे ? अरुणोदय व उषःकाल कान्यात्मक वर्णनाला अनुकूल असतात, म्हणून मानवी संस्कृतीचा किंवा व्यक्तीच्या शैक्षणिक संस्कारांचा अरुणोदय किंवा उषःकाल कवित्वस्फूर्तीला अनुकूल असतो असे तर म्हणणे नाही ? त्यांतली खरी गोष्ट अशी आहे की, ज्ञानामध्ये किंवा अनुभवामध्ये प्रगति होऊन मनुष्याला किंवा मनुष्यजातीला प्रौढत्व आले तर त्यामुळे कवितादेवी लाजते,