पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजीच्या प्रेमाची गोडी



 अत्यंत दिमाखदार इमारत पाच मजली. इमारतीसमोर अष्टकोनी हौद आणि झुरमुरत्या कारंज्याची नक्षी . अवतीभवती ट्युलिप्सची रंगबावरी वेटे.
 विद्या, एल्के आणि मी अशा तिघी त्या इमारतीच्या दरवाजाजवळ गेलो, तो दरवाजा आपोआप सरकला . हे आधुनिक तिळा उघड ,तिळा बंद प्रकरण मला नवंच होतं. प्रवेशद्वारातून आत शिरताना मनात आलं...जर या क्षणी तिळा बंद झाला तर? पण अगदी सुरक्षितपणे आत पोचलो.
 शेजारच्या काचबंद खोलीत दोन स्त्रिया काम करीत होत्या. त्यांनी आमची दखल घेतली नाही. मग पुढे चालत राहिलो. पुन्हा एका प्रशस्त पण बंदिस्त बागेत आलो होतो. मांजरीच्या चेहऱ्यासारखी, आपल्याकडे नजर रोखून बघणारी तऱ्हेतऱ्हेच्या रंगातली फुलं जिकडेतिकडे फुलली होती . जांभळी , पिवळी , तपकिरी ,गुलाबी ,लाल, अशा फिकट गडद रंगातली ती फुलं पाहून मन अक्षरशः प्रसन्न झालं. या फुलांचे नाव आहे स्टेप मदर. सावत्र आई. या फुलांचे रोखलेले डोळे आणि सिंड्रेला किंवा हिमगौरीच्या सावत्र आयांचे डोळे यातलं साम्य मी शोधू लागले.
 एवढ्यात माझी नजर गेली त्या तीन आजोबांकडे . बागेत तीन खुर्च्यात हे तिघे बसले होते. तिघेही किमान नव्वदीपलीकडे गेलेले असावेत. अगदी पिकल्या फळागत त्यांचे चेहरे .नजर शून्यात पोचलेली. भूत,भविष्य आणि वर्तमानाच्या पल्याड गेलेली.
 असणे आणि नसणे या दोहोंच्या सीमेवरील ती भकास, निर्लेप ,शून्य नजर पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. इतक्यात एक वयस्क गृहस्थ आमच्याजवळ आला. एल्के त्यांच्याशी जर्मन भाषेत बोलू लागली. आमच्याकडे पहात तो काहीतरी विशेष बोलत असावा असे वाटले. तो गेल्यावर एल्केने एक निःश्वास टाकला नि म्हटले , ते आजोबा म्हणत होते की गेल्या कित्येक वर्षात एकाच वेळी दोनतीन स्त्रियांचे इतके ताजे आणि तरुण आवाज ऐकले नव्हते . त्यांना आपली बडबड खूपच उत्तेजक वाटली . तुमच्या रेशमी साड्या खप आवडल्या त्यांना, आपल्याला शुभेच्छा दिल्यात त्यांनी!
 ऐकता ऐकता माझे डोळे भरून आले. विद्या मुकी झाली. पाश्चिमात्य देशांतील वृद्धांची समस्या मी ऐकून होते. पण त्याचे इतके आर्त आणि निरागस रूप मला प्रत्यक्षात छेदून जाईल असे वाटले नव्हते.

॥ ९२ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....