पान:वाटचाल (Vatchal).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४८ : वाटचाल

जेवणास जाऊ. तिथे आम्ही मिळून गेलो. तिला हे कर्तव्य वाटले. व्यासपीठावरही ती बसली. पण त्यात माझ्या कौतुकाचा भाव फार अल्प. ती स्वतःचे कर्तत्वकौतुक पाहण्यात दंग होती. मुंबई शहर तिला आवडले नाही. 'वर्दळ फार आहे' असे तिचे मत आहे. आपल्याला न आवडणारी मुंबई महाराष्ट्राची आहे असे तिचे ठाम मत आहे. मी विचारले, "पुरावा?" ती म्हणाली, "माझा विश्वास हाच सर्वांत मोठा पुरावा आहे." प्रभावतीबाईशी चर्चा करणे कठीण का, याचा बोध यावरून व्हावा.
 तिची काही ठाम मते आहेत. त्यांपैकी काही मते मला अतिशय अप्रिय आहेत. पण ती आहेत. तिचे एक ठाम मत असे की, ती भाग्यवान आहे. दगड्या, धोंड्या, कचऱ्याशी जरी तिचे लग्न झाले असते तरी तो वक्ता, प्राध्यापक, लेखक झाला असता, त्याला पैसा व मान मिळाला असता. मी विवाहाच्या वेळी बेकार होतो. इंटर, बी. ए., एम. ए. नंतर झालो. नोकरी नंतर लागली. प्राध्यापक, प्राचार्य नंतर झालो. माझा पहिला लेखसुद्धा विवाह ठरल्यावर प्रकाशित झाला. हा तिचा पुरावा आहे. या सर्व घडामोडींचा माझ्या लायकीशी अल्पही संबंध नाही. हे सारे फळ ती भाग्यवान असल्याचे आहे. कुणालाही जर तिने नवरा म्हणून निवडले असते तर हेच झाले असते, असे तिचे ठाम मत आहे. हे मत खोडून काढण्याचा मी प्रयत्न करून पाहिला, पण त्यात थोडेही यश आलेले नाही. “जे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे त्यावर चर्चा काय करणार?" असे तिचे म्हणणे. हे तिचे मत मला उत्साहदायी नाही. आनंददायक तर मुळीच नाही. अधिक दुःखाची गोष्ट ही आहे की, हे आमच्या मायधार्जिण्या मुलांचेच मत नसून प्रभाच्या सासू-सासऱ्यांचेही मत ती भाग्यवान आहे, असेच आहे.
 तिच्या मनाचा एक कोपरा अतिशय जुनाट आहे. घरातील कोणतेही काम मी करायचे नाही. जेवणासाठी पाणी घेणे मान्य नाही मग अंथरूण टाकणे, काढणे तर फारच दूर. सकाळचे उरलेले सायंकाळी मी खाणे तिला मान्य नाही. माझ्याआधी ती जेवत नाही. चारदोन महिन्यांत एखादा अपवादात्मक दिवस असा उजाडतो की, मी दिवसा जेवण करून झोपतो. तो तास अर्धा तास ती दारात उभी असते. इतरांना हाक मारू देत नाही. कावळे ओरडू नयेत म्हणून ती त्यांना खडे मारते. एकदा मी दिल्लीला गेलो. तिथे थैली विसरलो. पुढील प्रवासात मजजवळ पांघरूण नव्हते. माझी गैरसोय काहीच झाली नाही. दरगावी मला उत्तम पांघरूण मिळे. माझी चूक एकच झाली. हे मी तिला पत्राने लिहून कळविले. त्यानंतर मी घरी परतेपयंत ती राहत्या घरी थंडीत पांघरुणाविणा झोपली. " पत्रात काय लिहावे हे, बाबा, तुम्हाला कळत नाही," असा दोष मुलीने मला दिला. “जाऊ दे ग, त्यांना कधीच काही कळले नाही," असा समारोप पत्नीने केला. अशी ती ठार वेडी आणि कर्मठ आहे.