पान:वाटचाल (Vatchal).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रभावती कुरुंदकर : ४७

तिच्या मनाचा एक कोपराच बैरागी आणि फकिराचा आहे. जगात जणू कुणाशी तिचा संबंध नाही. माहेरीसुद्धा ती कधी फारशी जात नाही. माहेरी तिचे मन रमत नाही. या पंचविसाहून अधिक वर्षांत एक अपवाद सोडला तर ती कधी सलगपणे आठवडाभर माहेरी राहिलेली नाही. लोक म्हणतात, " तिला नवरा सोडून करमत नाही." ती म्हणते, " इथे तरी नवरा कुठे असतो? गावी असला तर घराबाहेर. घरी असला तर घोळका भोवती. अन् गावी नसला तर मग आनंदच सगळा." पण ती माहेरी रमत नाही. अपवाद फक्त एक. प्रसूतीसाठी एकदा माहेरी गेली होती, त्या वेळचा. त्याही वेळी तीन आठवड्यांत बाळंतपण आटोपून परतली. मग इथे येऊन दोन महिने विश्रांती. माहेर असो वा सासर, ती सर्वांशी गोड बोलते. कर्तव्याला चुकत नाही. मी सोडून कुणाशी भांडत नाही. पण लिप्तपणा कुठेच नाही. कदाचित थोडा लिप्तपणा माझ्यात असावा. गावातही कुणाशी फार मैत्री नाही, भांडण नाही, जवळचे मित्र नाहीत. मैत्रिणी नाहीत. आपण, मुले, घरकाम, सततचे कष्ट हा तिच्या सवयीचा भाग आहे. आणि चेहरा नेहमी थोडा गंभीर पण प्रसन्न असतो. तो चर्येचा भाग आहे.
 आज मी प्राचार्य आहे. पण पत्नी घर झाडते, स्वयंपाक करते, पाणी भरते, धुणे धुते, बाजारहाट करते. सततचे न संपणारे काम तिचे चालू असते. या कामाविषयी कुरकूर नाही. पैसा आला याचा फार आनंद नाही. गेला याचे दुःख नाही कर्जाची खंत नाही. गरजेपुरते मिळाले यात ती तृप्त आहे. ती माझ्याशी फार कमी बोलते. याची स्पष्टीकरणे तिनेच दिलेली दोन आहेत. " सारेच जण वेळ खातात. मीही तेच करू लागले तर वाचावे केव्हा?" हा खुलासा मला आवडतो. " अडाण्याशी काय बोलावे? त्याला व्यवहारात कळतेच काय ?" हा मला आवडत नाही. पण इलाज नाही. ऐकून घेणे भाग आहे. व्यसन एकच आहे. सिनेमा पाहण्याचे. दर आठवड्यास सिनेमा पाहते. पूर्वी आठ आण्यात बसे. आता वरिष्ठ तिकिटावर बसते.
 पतीवर अपार विश्वास आहे, असा तिचा दावा आहे. तो खरा असू शकतो. पण ते सोंगही असू शकते. मी सर्व महाराष्ट्रभर हिंडत असतो. ती माझ्यासह नसते. माझ्याभोवती मित्रमैत्रिणी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व चाहते यांचा घोळका सदैव राहिला. पण स्त्रीवरून कधी आमचे भांडण झाले नाही. मुंबई मराठी साहित्य संघाच्या संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. त्या वेळी मात्र ती आली होती. ज्या 'मुंबईसाहित्यसंघा'ने मला पदवी नसताना, वयही फार नसताना, नावावर पुस्तक नसताना, व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते (इ. स. १९५७) त्यांच्या संमेलनास जाणे तिला कर्तव्य वाटले. त्या आरंभीच्या काळी मंगेश पाडगावकरांनी मला घरी जेवणास बोलाविले होते. याही वेळी तिने सांगितले, पाडगावकरांच्याकडे आपण