पान:वाटचाल (Vatchal).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४४ : वाटचाल

पेरू फेकला. मी गच्चीत उभा होतो. मी तो पेरू झेलला. प्रथम भेट ही अशी. (दाता मी होते. याचक तू होतास. जन्मभर हेच चालणार, हे मला तरी कुठे कळले ? वय लहान होते ना? इति. सौ.)
 हे आवडणे पुढे सतत चार वर्षे चालू होते. ती मला पाहून हसे. मी तिला पाहून हसे. भेटीचे ठिकाण : वाहता रस्ता. वेळ : ती शाळेला जाताना. शाळेतून परतताना. रस्त्याच्या एका कडेने ती मैत्रिणींसह जाई. दुसऱ्या कडेला मी. याहून वेगळ्या गाठीभेटी नव्हत्या. पत्र अगर चिठ्ठी नव्हती. बोलणे नव्हते. आणि तरी एक दिवस धाडस करून मी विचारले आणि लग्न ठरले. पहिली भेट होताच आकर्षण पक्के. पहिले बोलणेच हे की, तू माझ्याशी लग्न करशील का ? आणि मग ठाशीव होकार. यामुळे गप्पा, भेटी, परस्परांना समजून घेणे इ. बाबींना आरंभ लग्न ठरल्यावर झाला. (ह्या घटनेवर सौ. प्रभावतीबाई तीन प्रतिक्रिया देत आल्या. त्यांना सोय असेल ती त्या वेळची ठाम मते. 'काय मेली जीवघेणी प्रतीक्षा. साधा मुद्दा कळायला चार वर्षे लागली आणि हा म्हणे शहाणा.' 'तुम्हीच हात जोडून आला होता. मी काही मागणी घातली नव्हती.' ' वाट पाहता येत नाही त्याने या वाटेने जाऊ नये.' )
 सर्व आयुष्यात जाणीवपूर्वक आणि निर्धाराने ती माझ्या इच्छेविरुद्ध एकदाच वागली. त्या निर्णायक महत्त्वाच्या जागी तिने माझा पूर्ण पराभव केला. पंचवीस वर्षे तो पराभव डाचतो आहे. मधून मधून क्रोध-संतापातून तो व्यक्त होतो. पण प्रभावतीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. होण्याचा संभव दिसत नाही. पत्नी आपल्याला मुळीच भीत नाही, तीवर आपला दाब नाही, उलट आपण तिला भितो हे कबूल करणे माझ्या पुरुषी अहंकाराला आवडत नाही. पण सत्य नोंदविणे भाग आहे.
 माझी इच्छा ही की, तिने मॅट्रिक व्हावे. नोकरीला लागावे. स्वतंत्र स्वावलंबी असावे. संसाराची जबाबदारी घ्यावी. म्हणजे समाजसेवेला मी मोकळा राहीन. विवाह ठरला त्या वेळी ती मॅट्रिकला बसत होती. मीही मॅट्रिकच होतो. कुणालाच नोकरी नव्हती. आम्ही स्त्रीस्वातंत्र्यवादी सेवादलवाले. आम्ही सर्व नेते व अनुयायी मंडळीत नोकरी, कमाई व संसार यांची जबाबदारी गळ्यात घेऊन पत्नीने स्वतंत्र व्हावे व फक्त खर्च, व्याख्याने, गप्पा अशी समाजाची बांधिलकी आपण घ्यावी अशी रूढीपरंपरा मान्य आहे. जे सर्वमान्य आहे तेच मी तिला सांगत होतो. प्रभा बोलली काहीच नाही, पण ती मॅट्रिक नापास झाली. आजवर ती कधी नापास झाली नव्हती. वुद्धी अतिशय चांगली, पण या वेळी ती नापास झाली. मला आश्चर्य वाटले. पण प्रकाश पडला नाही. स्त्रीच्या मनातले आपल्याला लवकर कळत नाही असा माझा नित्याचा अनुभव आहे,