पान:वाटचाल (Vatchal).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझे मामा : रामचंद्रराव नांदापूरकर : २९

म्हणून उल्लेख आलेला आहे, ते म्हणजे खाऊनपिऊन सुखी असणाऱ्या बऱ्यापैकी मध्यम धरातले गृहस्थ होते. माझे आजोबा अतिशय शांत, प्रेमळ व समजूतदार होते. त्यांनी सर्वांच्यावर माया केली. कुणाशी भांडणे त्यांच्या स्वभावात नव्हते. सुनेनेसुद्धा मोठ्या जिव्हाळ्याने व आपुलकीने उल्लेख करावा असे त्यांचे ऋजू व्यक्तिमत्त्व होते. हे आमचे बऱ्यापैकी खाऊन पिऊन सुखी असणारे घर आणि या घरी असणारे माझे अल्पशिक्षित कारकुनी करणारे आजोबा यांचा मामींनी ' सधन श्रीमंत सासर' म्हणून उल्लेख केलेला आहे. ही सधनता व श्रीमंती खाऊन पिऊन सुखी असण्याइतकीच होती. आजी कृष्णाबाई ही मात्र कर्तबगार स्त्री होती. अतिशय कष्टाळ, व्यवहारी, पण तितकीच रागीट, भांडणारी, संतापी अशी ती सुभेदाराची लेक होती. माझ्या आजीच्या स्वभावात जिद्द, कष्टाळूपणा आणि प्रेमळपणा तर होताच; पण त्याबरोबर तेढेपणा आणि भांडकुदळपणासुद्धा होता. सामान्यपणे आजीचे नातवांच्यावर प्रेम असते आणि ते भोळेभाबडे असते असे म्हणतात. पण माझी आजी माझ्या धाकट्या बहिणीशी म्हणजे स्वतःहून साठ वर्षे लहान असणाऱ्या नातीशीसुद्धा भांडली, रुसली आहे. ही आजी करारी आणि हिंमतवान होती. संकटांना डगमगणारी नव्हती. स्वभावाने तिखट होती. सगळ्याच सुनांना तिच्या या स्वभावाचा त्रास झालेला आहे. माझ्या मामी जुन्या वळणाच्या. सासूशी प्रत्यक्ष त्या भांडल्या, पण सासूच्या माघारी त्यांनी आपल्या सासूविषयी फार संयमाने उल्लेख केला आहे. शेवटी सासू म्हणजे आपल्या नवऱ्याची आई. माघारी तिच्याविषयीचा उल्लेख जपून व संयमाने करावा, ही जुन्या वळणात वाढलेल्या स्त्रीची स्वाभाविक पद्धत मामींनी पाळलेली आहे.
 या माझ्या आजोळी, पहिला अतिशय कर्तबगार माणूस म्हणून माझे वडील मामा नारायणराव नांदापूरकर यांचा उल्लेख केला पाहिजे. परभणीला आमच्या आजोबांनी, आपल्या वडील मुलाला कसेबसे सातवीपर्यंत शिकविले. नंतर त्यांनी आपल्या मुलाला हे समजावून सांगितले की, आता तुला कमावते होणे आवश्यक आहे. या वेळी माझे मोठे मामा पंधरा वर्षांचे होते. त्यांचे लग्न होऊन पाच वर्षे झालेली होती. हे माझे मामा परभणीहून हैद्राबादला आले. काबाडकष्ट करीत कधी वार लावून जेवत, कधी नानाविध उद्योग करीत, असे ते मॅट्रिक झाले. याहीपुढे नोकरी करीतच ते शिकले आणि मराठी आणि संस्कृतचे एम. ए. झाले. ते मराठवाड्यातील मराठीचे पहिले पीएच्. डी. होत. ते, मराठीचे सर्वत्र मान्यता पावलेले विद्वान, निवृत्त होताना उस्मानिया विद्यापीठात मराठी विभाग-प्रमुख होते. नांदापूरकरांचे नाव घेऊनच मराठवाड्यातील मराठी साहित्याची उपासना आधुनिक काळात समृद्ध झाली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या मध्यवर्ती वास्तुला त्यांचेच नाव आहे. मराठवाड्यातील मराठीचे सर्व अभ्यासक कै. डॉ. नारायणराव नांदापूरकर