पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


जीवन-दर्शन - खलील जिब्रान भाषांतर - रघुनाथ गणेश जोशी प्रकाशन - सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला, १२, टिळक रोड, पुणे - २, प्रकाशन - १९४१ पृष्ठे - ७०, किंमत - १ रु. १२ आणे.



जीवन दर्शन

 मला जर कुणी तुमचे आवडते पुस्तक कोणते? असा प्रश्न केला तर क्षणाचाही विचार न करता उत्तर देईन, खलील जिब्रानचे 'दि प्रोफेट'. मुळात इंग्रजीत लिहिलेले हे महाकाव्य. काव्यात्मक गद्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून 'प्रोफेट ला ओळखले जाते. जगातील ४० भाषांत प्रॉफेट भाषांतरित झाले आहे. मराठीत प्रोफेटची चार भाषांतरे झाली आहेत. र. ग. जोशीकृत 'जीवनदर्शन' हे त्यापैकी एक होय. सार्वकालिक अभिजात साहित्यात प्रोफेटची गणना केली जाते. यात २६ गद्यात्मक कविता आहेत. हे पुस्तक जीवन व मानवसंबंधांवर भाष्य करते. महाप्रस्थान, प्रेम, विवाह, श्रम, बालके, घर, वस्त्र, कायदा, स्वातंत्र्य, मैत्री, अध्यापन, साधुता, सुख, प्रार्थना, धर्म, मृत्यू इत्यादी विषयांवर या गद्यकाव्यात भाष्य केले आहे. जीवनातल्या कोणत्याही प्रसंगी मार्गदर्शन करणारे हे पुस्तक. प्रत्येक वेळी या कविता आपणास नवा अर्थ समजावतात. या पुस्तकाचे सारे सौंदर्य त्याच्या साधेपणात आहे. जगातील सोप्या भाषेतलं महाकाव्य म्हणून त्याचा लौकिक आहे. सर्वसामान्य माणसाला एका शब्दासाठीपण हे काव्य आवडत नाही.

 या काव्याचा कवी खलील जिब्रान हा शेक्सपिअर, लाओत्सेनंतर जगभर वाचला जाणारा, माहीत असलेला साहित्यिक, कवी, चित्रकार,

वाचावे असे काही/९३