पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कथाकार, तत्त्वज्ञ म्हणून जगभर तो ओळखला जातो. त्याचा जन्म सन १८८३ चा. सिरियातील लेबॉनन टेकड्यात वसलेला बिशरीं गावी जो जन्मला. बैरूतच्या 'मदरसतुल हिकमत' मध्ये त्याचे शिक्षण झाले. त्याचे सर्व शिक्षण अरबीमध्ये झाले. त्यामुळे त्याचे प्रारंभिक लेखन अरबी भाषेत आढळते. अमेरिकेला गेल्यावर तो इंग्रजी शिकला. उत्तर काळात त्यांनी इंग्रजीत लेखन केले. १९०१ ते १९०३ मध्ये पॅरिसमध्ये राहून चित्रकलेचे शिक्षण घेतले. त्याच्या सर्व पुस्तकात त्याची स्वतःची चित्रे आहेत. मानवी चित्रे अधिकांश नग्न आढळतात, पण ती अश्लील नसतात. लेखनाइतकीच खलील जिब्रानची चित्रे विचारगर्भ मानली जातात. तो स्वतःला राजकारणी मानत नसे. परंतु त्याच्या विचारांची दखल सर्वत्र घेतली जायची. तो सर्व जगास आपली मातृभूमी मानायचा. विश्वबंधुत्व वृत्तीमुळे त्याचे साहित्य सार्वकालिक मानवी उन्नतीचे प्रेरणा गीत मानले गेले. न्यूयॉर्कमध्ये असलेली त्याची समाधी आंतरराष्ट्रीय स्मारक मानली जाते. त्याच्या जन्मगावी उभारण्यात आलेले वस्तुसंग्रहालय प्रेक्षणीय आहे.

 'प्रोफेट' हे संवाद शैलीत लिहिलेले महाकाव्य आहे. ते काव्य असले, तरी गद्यमय आहे. एखाद्या गोष्टीचे पुस्तक वाचतो तसे ते वाचता येते. या काव्यातील नायक अल्-मुस्तफा हा एक प्रवासी आहे. तो आपले गाव सोडून ऑरफॉलीझच्या समुद्रकिनाऱ्यावर उतरून बारा वर्षे उलटली तरी त्याला आपल्या मायदेशी घेऊन जाणारे जहाज भेटत नाही. 'ने मजसी ने परत मातृभूमीला' अशी तळमळ असताना तपभरानंतर तो आज परतणार असतो, पण तपभराच्या वास्तव्यात ऑरफॉलीझवासी व अल्-मुस्तफा यांच्यात जिवाभावाचे नाते निर्माण झाले असते. त्याचे एकमेव कारण असे की तो गावकऱ्यांना आपल्या जगप्रवासाच्या अनुभवावरून ज्या जीवाभावाच्या गोष्टी सांगायचा त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य व्हायचे. जीवन सुसह्य करणारे समुपदेशक काव्य म्हणून वाचणाऱ्या प्रत्येकास जे हवं ते देते म्हणून सर्व जग ते सुमारे शतकभर वाचत आले आहे.

 खलील जिब्रानने 'प्रोफेट' मध्ये प्रेमाविषयी समजावताना म्हटले आहे, 'तुम्हाला कुणाकडून, कुठून प्रेम मिळत असेल तर त्याचे मागे नक्की जा. पण लक्षात असू द्या, प्रेमाचा मार्ग नेहमीच बिकट राहिला आहे. प्रेमाच्या मागे जाणे म्हणजे सुळावरची पोळी. प्रेम पंख पसरेल तर आरूढ व्हा. त्याच्या पंखात लपलेली तलवार तुम्हास जखमी करेल. त्या जखमेवरपण विश्वास ठेवा. ती तुम्हाला खूप शिकवत राहील.' अशा शिकवणीने हे

वाचावे असे काही/९४