पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मशीद विध्वंसानंतर मुंबईत उसळलेल्या जातीय, धार्मिक दंगलीची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी गंभीरपणे हे नोंदवले आहे की, 'येथून पुढे राज्य घटनेच्या आधारे स्थापन झालेल्या सरकार आणि संस्था, यंत्रणांनी दंग्यांच्या कारणांची अधिक गांभीर्याने व जबाबदारीने चौकशी करायला हवी.' या पुस्तकात गुजरात दंगलीच्या काळात पोलीस विभागातील सर्वोच्च अधिकारी जी. एल. सिंघल, राजन प्रियदर्शी, अशोक नारायण, उषा राडा, जी. सी. रायगर, पी. सी. पांडे, चक्रवर्ती प्रभृती मान्यवरांच्या स्टिंग ऑपरेशन करून छुप्या कॅमेरा नि रेकॉर्डरच्या आधारे घेतलेल्या मुलाखती आहेत. त्या वाचत असताना माझ्या कानात एक इंग्रजी वाक्य वारंवार घुमत, गुंजारव करत होतं - 'पॉवर करप्टस् अ‍ॅबसोल्यूट पॉवर करप्ट अ‍ॅबसोल्यूटली'. (सत्ता नेहमी भ्रष्टच असते. सत्ता जितकी निरंकुश तितकी ती बेबंद, अमर्याद भ्रष्ट असते.) राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री पोलीस उच्चाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जे बेकायदा काम करण्याचे आदेश देतात, ते वाचले की सरकार नि पोलीस यांच्या संगनमतामुळे लोकशाही, घटना, यंत्रणेवरचा विश्वास उडून जातो, हे मात्र खरं!

 गुजरात राज्याचे पोलीस एटीएस प्रमुख असलेले व ३० वर्षे गुजरातमध्ये आयपीएस सेवेतील उच्चपदे भूषविलेले राजन प्रियदर्शी यांना ते केवळ दलित म्हणून दलित वस्तीतच आजन्म राहावं लागतं. जातीय अस्पृश्यतेचे बळी जी. एल. सिंघल, श्री. वंजारी यांच्या यातील व्यथा वाचा. गावचा न्हावी त्यांचे केस कापायला नकार देतो, उच्चभ्रू वस्तीत त्यांना पद, पैसा, प्रतिष्ठा, सरंजाम असून जागा, घर मिळत नाही. हे कसलं 'इंडिया शायनिंग', 'भारत उदय', 'नवभारत' सारे शब्दखेळ नि बुडबुडे. आपण सारे भारतीय जात, धर्माबाबत अजून बोलघेवडे पुरोगामी आहोत. कृतीच्या क्षणी आपण पारंपरिक, कर्मठ सनातनी होतो. 'कहो ना, करो' हा आपल्या जीवन शैलीचा मूलमंत्र होईल त्या दिवशी आपली लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, विज्ञाननिष्ठा, विवेकवाद इ. मूल्ये आचारधर्म होणार. ती व्हावी याचा आग्रह धरणारे हे पुस्तक. ते कितीतरी बुद्रुक राजकारणी, सत्ताधीशांचं प्रतिमाभंजन करत त्यांचं वास्तविक खुर्द रूप उभं करतं.

 मूळ इंग्रजी पुस्तक कैसर राणा, राहुलकुमार, मुकुल सरल, मुकुल व्यास, एम. प्रभाकर, उपेंद्र स्वामी इ. सहकाऱ्यांनी अध्याय वाटून घेऊन अल्पावधीत हिंदीत आणल्याने बहुसंख्य भारतीय ते वाचू शकले. याचा

वाचावे असे काही/१४०