पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विथ हुसेन पेंटिंग्ज'. सुमारे पावणे तीनशे पानाचं पुस्तक हुसेन यांच्या अंतरंग जीवन, विचारांनी भरलेलं नि भारलेलंही! पुस्तक अर्थात हुसेनला आवडलं. त्यांनी अशोक चोप्रांना आभाराचं पत्र पाठवलं ते सोबत होडीत बसलेल्या घाटदार सुंदरीच्या चित्रासह. गंमत अशी की पोहचतं फक्त पत्र. चित्र गायब! तशीच गोष्ट जगविख्यात चित्रकार एफ. एन. सूझांची. त्याचं आत्मचरित्र लिहून झालं. पुस्तकासाठी म्हणून सूझानी विदेशातून आपली मूळ चित्रं भक्कम विमा भरून भारतास पाठवली. कस्टमनी अश्लील म्हणून जप्त केली. संसदेत मोठा गदारोळ होतो. खटला चालतो. निकाल लागतो. चित्रं अश्लील नसल्याचं जाहीर होतं. पण एव्हाना सूझाचा उत्साह मावळतो. तो पुस्तक न काढायचं ठरवतो. आपण वाचक शासनाच्या लालफितीशाहीमुळे एका चांगल्या पुस्तकाला मुकतो आणि आज तर त्या चित्रकारालाही!

 हे पुस्तक वाचनीय, अवाचनीय मजकुरांनी भरलेले आहे. आंबट शौकिनांना हे पुस्तक फटीतून पाहायला आवडणारे जगही दाखवेल. मला या पुस्तकाने लेखक, लेखन, पुस्तकांची बाजारपेठ, प्रकाशन सोहळे, प्रकाशनाविषयी शासन दृष्टी, साहित्य शोध, प्रकाशन संक्रमण अशा अंगांनी नवं जग दाखवलं. हा लेखक माझ्या दृष्टीने भारतीय प्रकाशन व्यवसायाचा दीर्घकालीन भागीदार, साक्षीदार निरीक्षक म्हणून त्याची मते मननीय वाटली. आपली गोची आहे की आपले सनदी अधिकारी, राजकारणी फार कमी वाचतात व वाचलेल्यावर तर विचारच करीत नाहीत. त्यांना वाचायची सद्बुद्धी झाली तर आपला देश विकास योजनापेक्षा मनुष्य विकासानी लवकर समृद्ध, संपन्न होईल हे त्यांना कळेल.

 अशोक चोप्रा चांगले वाचक, लेखक होते म्हणून चांगले प्रकाशक होऊ शकले. जोसेफ ब्रॉडस्की, लिओ टॉलस्टॉय, अ‍ॅन हॉलंडर, मंटो, मोपांसा, अर्नेस्ट हेमिंग्वे, बोरिस पास्तरनाक वाचलेला असल्यामुळे भारतीय इंग्रजी लिखाणाची प्रत जोखण्याचं त्यांच्यात कौशल्य आलेलं. म्हणूनही या आठवणींचं एक तुलनात्मक महत्त्व आहे. त्यांची अन्य अनेक वाचनीय पुस्तके आहेत. हे पुस्तक लेखकांच्या लकबी, स्वभाव, खासगी जीवन समजावणारं म्हणून चक्षुर्वे सत्यम्। इस्मत चुगताईंना लिहिताना जवळ पत्त्यांचा डाव लागायचा, खुशवंत सिंह नव्या पुस्तकाची सुरुवात नव्या महागड्या पेननेच करायचे, अमृता प्रीतम बिछान्यावर लोळण घेऊन लिहायची, नाटककार बलवंत गार्गीना टेबलाशिवाय लिहिताच यायचं नाही, अर्नेस्ट

वाचावे असे काही/१२८