पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निघतो म्हणाले म्हणून. परत यांचा गप्पांचा फड रंगलेलाच. वाट पाहून यांच्या घशाला कोरड पडली असेल म्हणून प्रभाताईंनी पहाटे चारला दुसरा चहा आणून ठेवला. आता मात्र हमीद दलवाई खजील झाले. वहिनींना म्हणाले, "वहिनी, काय हा त्रास तुम्हाला! मी म्हणजे काय शुद्धीवर नसतोच मुळी!" प्रभाताई म्हणाल्या, "शुद्धीवर नसणाऱ्यांचेच हे घर आहे. शुद्धीवर असणाऱ्यांना इथे वावच नाही." दलवाई कुरुंदकरांना म्हणाले, "गड्या, धार फार तिखट आहे." अशा पत्नीचं बाहेरून काटे नि आत फणसाच्या गऱ्याची कोमलता असलेलं व्यक्तिमत्त्व वाचणं म्हणजे आपल्या पत्नीला आपल्या मनाच्या आरशात पाहणं होय. या भागात यदुनाथ थत्ते, अनंत भालेरावांवरचे व्यक्तिलेख वस्तुनिष्ठ आहेत.

 या ग्रंथात 'स्वतःविषयी' विभागात नरहर कुरुंदकरांनी जे आत्मचरित्रात्मक लेख लिहिलेत त्यात कुरुंदकर स्वतःविषयी किती कठोर होऊन लिहू शकतात ते वाचलं की या माणसाचं तर्ककठोर व्यक्तिमत्त्व उभं राहतं. मी कुरुंदकरांना शालेय वयात अनेकदा ऐकलं. तरुण वयात अनेकदा वाचलं. 'धार आणि काठ', 'मागोवा', 'रूपवेध' ही कायम लक्षात राहणारी पुस्तकं. इतका मोठा विद्वान पण त्यांचा ग्रंथसंग्रह नव्हता हे वाचलं की आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. सदर पुस्तकात प्रा. नरहर कुरुंदकरांविषयी चार पिढीच्या संपादकांनी लिहिले आहे. 'मराठवाडा'कार अनंत भालेराव, 'साधना'कार यदुनाथ थत्ते, 'लोकमत'कार सुरेश द्वादशीवार आणि 'लोकसत्ता'कार गिरीश कुबेर. सर्वांचं प्रा. नरहर कुरुंदकरांच्या विद्वत्तेवर मात्र एकमत. ही सर्व मंडळी वैचारिक गोंधळावर उतारा म्हणून कुरुंदकर वाचत होते, काही आजही वाचतात. यातील एका विधानाकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो, 'विचारवंत' ही उपाधी तत्कालीन संपादकांच्या मस्तकावर (कुरुंदकरांच्या तुलनेन) सैलच राहिलेली आहे. या महावाक्यात कुरुंदकरांचं समग्र श्रेष्ठत्व सामावलेले दिसते. म्हणूनही समग्र कुरुंदकर वाचले पाहिजेत.

 'निवडक नरहर कुरुंदकर मालेत अजून चार खंड प्रकाशित व्हायचे आहेत. पट्टीच्या वाचकांना त्याची प्रतीक्षा आहे. प्रा. कुरुंदकर व्यक्ती व विचार म्हणून माझ्या पिढीचे 'आयकॉन', 'आयडॉल' होते हे खरे. पण त्यांना पाहात, वाचत, ऐकत असताना आपण त्यांच्या पासंगालाही पुरत नाही या क्षुद्रपणाची जाणीव आम्हास सतत अस्वस्थ ठेवायची. वर्तमानाचं क्षुद्रपण असं की असं अस्वस्थ करणारं व्यक्तिमत्त्व नि विचार संचित

वाचावे असे काही/१२१