पान:वाचन (Vachan).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वत:ला नव्या पद्धतीने, नवे काही लिहिता यावे म्हणूनही तो वाचत रहात असतो. नवशक्यतांच्या शोधार्थ त्याचे वाचन सुरू असते. लेखन नवे शिकण्यासाठी म्हणून पण वाचतो. या सर्व प्रकारच्या वाचनातून त्यास काही हाती येत रहातं. त्यातून त्यास नवी प्रेरणा, ऊर्जा, कल्पना, विचार मिळतो आणि त्यातून लेखकाचं साहित्य सृजन होतं. असं सृजनात्मक वाचन त्याला निर्दोष करत रहातं. नव्या जिज्ञासा, संकल्पांची नवं क्षितीज त्याला सृजनार्थ केलेल्या वाचनातून हाती येत असतात.
  वाचक या भूमिकेतला लेखक नित्य नव्याच्या शोधात असतो. हा शोधाचा ध्यास त्याला नित्य सजग, सक्रिय वाचक बनवतो. मग अनेक शंका, कुशंकांचे ढग दूर होण्यास अशा वाचनातून लेखकास मदत होत रहाते. लेखन आणि वाचन ह्या परस्परपूरक अशा सजीव प्रक्रिया होत. लेखन, विचार, कल्पना यातून आकार घेत रहातात. समकालीनांचं वाचन साहित्यिक अधिक सजगपणे करत स्वत:चं लेखन वेगळे बनविण्याचा प्रयत्न करत असतो. चालू असलेलं हातातलं लेखन अधिक कलात्मक, नवं व्हावं असाही त्याचा प्रयत्न असतो. म्हणूनही तो वाचत असतो.
  आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण साहित्याशी एकरूप होत असतो. त्यातल्या प्रत्येक शब्द, वाक्य, संकल्पनेवर आपलं लक्ष केंद्रित असतं. आपण जेव्हा मन:पूर्वक, साहित्याशी एकरूप होऊन वाचत असतो, तेव्हा त्या वाचनाचा प्रभाव, परिणाम किती विविध रूपांनी आपल्यावर होत रहातो म्हणून सांगू? पुस्तकातील दृष्य वा प्रतिमा मूर्त होतात. त्यातील भाव आपणास प्रभावित करतात. वाचताना हर्ष, शोक, आश्चर्य, शृंगार, भक्ती, निर्वेद सारे भाव प्रसंगपरत्वे आपल्यात निर्माण होतात. वाचताना आपण हसतो तसे रडतोही. आनंदी होतो, तद्वत दुःखीही! इतकं सर्व असूनही आपण वाचत रहातो. कारण जिज्ञासा, ओढ आपणास पुस्तकाशी बांधून ठेवते. ताणतणाव, भय, सारं असतं, तरी आपण सैल, शिथिल होण्यासाठी वाचतो. कारण वाचनात एक उपजत प्रेरणा असते. ही आपल्यातला वाचक जिवंत ठेवते. असं वाचन आपली अन्तर्दृष्टी विकसित करते.

  म्हणून मग आपण कथा, कादंबरी, काव्य, नाटक, निबंध असं बहुरूप वाचन करत रहातो. या प्रत्येक प्रकारचं स्वत:चं असं वाचकांना बांधून ठेवणारं बलस्थल असतं. वाचन हा गुंतवून ठेवणारा छंद, खेळ आहे खरा! वास्तव नि कल्पनांचा सुमेळ वाचन घडवून आणतं. म्हणून मग साहित्यही तसं निर्माण होतं. गद्य, पद्य दोन्ही शैली वाचकास समानपणे रिझवतात.

वाचन/९१