पान:वाचन (Vachan).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२.१ लोकसाहित्य प्रकार:
२.१.१ लोकगीते
 प्रत्येक लोकसंस्कृतीची स्वत:ची अशी लोकगीते असतात. ती त्या त्या देश, प्रदेश, प्रांताचे जनमानस, जनसंस्कृती, जनपरंपरासूचक असतात. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांत बिह, तुसू, रास, तिजा, हातगा, अशी असंख्य लोकगीते आढळतात. ती सण, वार, उत्सव इत्यादींमध्ये गायली जातात. हर्ष, शोक, आश्चर्य, आनंद भावसूचक ही गीते बारसे, ओटीभरण, विवाह, शोक, विरह इत्यादी प्रसंगाने रचली, गायली जातात. काही धर्म, परंपरा सूचकही असतात.
२.१.२ लोककथा
 लोककथा स्थळ, काळ त्यांचा काही असो, त्या वैश्विक असतात हे मात्र खरे. या सुबोध असतात तशा गूढही. त्यांच्या सादरीकरणाची पद्धत मात्र चित्ताकर्षक असते. कथाकार, कथावाचकास अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. त्यामुळे या कलात्मक होतात नि सुदूर त्यांचा प्रचार, प्रसार होतो. त्यामध्ये मिथक, बोध, वृत्तांत, वर्णन असे अनेक प्रकार संभवतात. यात प्राणी, पक्षी, नदी, पर्वत, दऱ्या इत्यादी निसर्ग कथाही असतात. साहस, भय, आश्चर्य साऱ्या भावांनी भरलेल्या या कथा लोकसमूहास भुरळ घालत. त्यांची खुमारी, लज्जत कथावाचक, कथाकारावर अवलंबून असे. या कथा पात्र, प्रसंग, संघर्षांनी ओतप्रोत भरलेल्या असत. उत्कंठावर्धक या कथा शिकार कथा, प्रवास कथा, गिर्यारोहण तर कधी देवादिक, भूतप्रेत इत्यादी वर्णन करणाऱ्या असत.
२.१.३ लोकनाट्य

 लोकनाट्यांचा प्रारंभ सामूहिक रंजन, बोधाच्या गरजेतून झाला. प्रारंभीच्या काळातील लोकनाट्ये देवकथा, अवतार कथा, दैवी चमत्कार कथांवर आधारित असत. संवाद, अभिनय, संघर्ष, संगीत उत्कंठा यांवर बेतलेली ही लोकनाट्ये तत्कालीन जनसमूहाच्या जगण्या-झगडण्याचेच प्रतिबिंब असल्याने ती लोकांना विलक्षण भावत. देवालय उत्सव, गावजत्रा, ग्रामोत्सव इत्यादी प्रसंगी लोकनाट्याचे खेळ होत. भारतात यक्षगान, दशावतारी, भवाई, माच, अंकियानट, कुरवंजी असे अनेक प्रकार वेगवेगळ्या प्रांतात रूढ आहेत. नंतरच्या काळात महाराष्ट्रात रूढ झालेले तमाशे, जलसे हे पूर्व लोकनाट्याचे आधुनिक रंजक रूप होय.

वाचन/२३