पान:वाचन (Vachan).pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्तरार्धात मोनोटाइप आणि लिनोटाइप मुद्रण यंत्रांचा शोध लागून छपाई अधिक सुबक आणि गतिमान कशी बनली याची एक कथाच हे पुस्तक सांगते.   विसाव्या शतकात या क्षेत्रत आमूलाग्र बदल झाला. एकामागून एक गतिमान छपाईची यंत्रे विकसित होत गेली. या काळात पुस्तक छपाईची गती प्रचंड वाढली. पुस्तकांची दुकाने, प्रकाशन गृहे, ग्रंथालये यांची वाढ यामुळेच होऊ शकली. छपाई सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली. त्यामुळे कोणीही आपले पुस्तक स्वत:च छपाई करून प्रकाशित करू शकत होते. आता एकविसाव्या शतकात पुस्तकांची जागा मोबाईल, लॅपटॉप किंवा किंडलसदृश उपकरणे घेऊ लागली आहेत. आदिमानवाने दगड, खडकांवर ओढलेल्या ओरखड्यांपासून लॅपटॉप किंवा आयपॅडवरील आभासी लेखनापर्यंतचा थक्क करून सोडणारा लेखनाचा प्रवास डॉ.लवटे यांनी या पुस्तकात ग्रंथबद्ध केला आहे. आधुनिक जगाच्या विकासात ग्रंथाचे स्थान वादातीत आहे. त्यामुळे मुद्रण आणि ग्रंथाबाबतचे गतीने लागलेले हे शोध आणि मानवाची प्रगती याचा परस्परसंबंधही दाखवता येतो. त्यामुळे अशा प्रकारच्या लेखनातून मिळणारी माहिती अनेक कारणांसाठी आवश्यक अशीच आहे.   या पुस्तकाचा शीर्षविषय ‘वाचन' हा आहे. या विषयाला 'ग्रंथवाचन: पद्धती आणि प्रकार या मुद्यापासून सुरुवात होते. ग्रंथ कसे वाचावेत याविषयीचे विवेचन सुरू करताना डॉ. लवटे यांनी फ्रान्सिस बेकनचं एक प्रसिद्ध विधान उधृत केले आहे. बेकन म्हणतो, 'काही पुस्तकांची नुसती चव बघायची, काही गिळायची तर काही चाखत पचवायची.' अशी विधाने वाचकाला पुस्तकांची वर्गवारी करायला शिकवतात. मॉर्टिमर अडलरचे 'हाऊ टू रीड अ बुक'मधील वाचनाचे प्रकार आणि पद्धती डॉ. लवटे यांनी विस्ताराने दिलेल्या आहेत. प्राथमिक वाचन, निरीक्षक वाचन, विश्लेषणात्मक वाचन, सारभूत वाचन या वाचनाच्या प्रकारांबरोबर मुखपृष्ठ, शीर्षक व मलपृष्ठ वाचन, पुस्तकपूर्व मजकूर (मनोगत, प्रस्तावना इत्यादी), कथेतर ग्रंथामधील उपशीर्षकरचना, प्रकरणे व उपसंहार आणि समीक्षा, परीक्षणे वाचन या ग्रंथाचनाच्या पद्धती सांगून ग्रंथवाचनाला चालना देणाच्या ग्रंथालयांच्या विकासावरही भाष्य केले आहे.   वाचन ही माणसाला उन्नत करणारी प्रक्रिया आहे. वाचनाविषयी बराच विचार झालेला आहे. परंतु तो विखुरलेल्या स्वरूपात आहे. मराठीमध्ये हा

विचार क्षीण स्वरूपातच दिसतो.

वाचन १६७