नवीच माहिती या पुस्तकातून उपलब्ध होते. डॉ. लवटे यांनी या लिप्यांचा
आढावा घेऊन इ.स. सातव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंतची जी
लिखित साधने आपण पाहतो, ती या लेखनविकासाची परिणती असल्याचे
सांगितले आहे.
लिप्यांच्या विकासाबरोबरच ग्रंथांची निर्मिती आणि ग्रंथालयांचा विकास
झालेला आहे. ग्रंथाचे मानवी जीवनातील स्थान वादातीत आहे. ज्ञानाचे वहन
ग्रंथाच्या निर्मितीने सुलभ झालेले आहे. डॉ.लवटे यांच्या 'वाचन'चे स्वरूप
शास्त्रीय आहे. अनेक संकल्पनांची वस्तुनिष्ठ माहिती सांगण्याबरोबर शब्द,
शब्दार्थ, व्युत्पत्ती आणि व्याख्या देण्यावर त्यांचा भर आहे. 'ग्रंथ' या
संकल्पनेचा त्यांनी विस्ताराने विचार केला आहे. त्यासाठी ग्रंथाची संकल्पना
स्पष्ट करून अनेक प्रकारच्या ग्रंथांची सचित्र माहिती हा या लेखनाचा आणखी
एक विशेष आहे. प्राचीन काळापासून माणसाने निर्माण केलेले ग्रंथ,
ग्रंथलेखनाची सामग्री, पुस्तकांचे बदलत गेलेले स्वरूप, पुस्तके ठेवण्याच्या
जागा, पद्धती, त्याचबरोबर पुस्तके वाचनाची पद्धती अशी बरीच सचित्र
माहिती या पुस्तकात येते. त्यामध्ये इष्टिका ग्रंथ, पपायरस वनस्पतीपासून
बनवलेल्या कागदी गुंडाळी पुस्तकांसारख्या दुर्मिळ गोष्टी या पुस्तकात
पाहायलाही मिळतात. प्राचीन काळीही हस्तलिखित ग्रंथ जमवून त्याचा संग्रह
करण्याची पद्धत होती. हा संग्रह ठेवण्याची कपाटे, लेखक त्या वेळच्या
पपायरस वनस्पतीपासून बनवलेल्या गुंडाळी कागदावर कोणत्या पद्धतीने
लिहायचे- असे सारेच या पुस्तकात आलेले आहे.
अनेक देशांची ग्रंथविषयक संस्कृती येथे संक्षेपाने सांगितली आहे.
हस्तलिखित ग्रंथाची परंपरा कुठे दिसते, कठे कित्ता करण्याचा प्रघात होता,
वेगवेगळ्या धर्मामध्ये कोणत्या रूढी होत्या, कोणत्या देशांमध्ये पुस्तकांची
मोठी बाजारपेठ होती इथपासून एकटया बगदादमध्ये हिजरी ९०० च्या
काळात शंभर कित्ता विक्रेते असल्याची माहितीही या पुस्तकातून मिळते.
गुंडाळी, विटा, चर्मपत्रे, भूर्जपत्रे इत्यादींच्या वापरानंतर मुद्रणाच्या इतिहासात
लाकडी ठसे वापरून छपाई सुरू झाली. इ.स. २२० च्या सुमारास चीनमध्ये
हान राजवटीच्या काळात लाकडी ठसे वापरायचा प्रारंभ झाला, शाई, रंगांचा
वापर करून चित्रे आणि अक्षरे कागदावर उठवण्याचा तो प्रारंभ होय. त्यानंतर
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात वाफेवर चालणा-या मुद्रण यंत्राचा शोध
लागला आणि मुद्रणप्रक्रियेने गती घेतली. ही यंत्रे ताशी ११०० पानांची
छपाई करीत असत. परंतु या गतीने ठसेजुळणी शक्य नसे. पुढे याच शतकाच्या