पान:वाचन.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
वाचन

तत्द्वारा प्रेक्षकांच्या उच्च मनोवृत्ति उचंबळविणारी व प्रेक्षकांच्या मनावर वज्रलेख उमटविणारी नाटकें जेवढीं होतील आणि तीं लोकांच्या वाचण्यांत अधिक येतील तेवढीं इष्टच होत.
 मराठ्यांच्या इतिहासांतील निवडक प्रसंग निवडून त्यांवर मराठींत नाटकें झालीं आहेत. रजपूत लोकांनी स्वातंत्र्य, स्वधर्म व स्वदेशरक्षणार्थ मुसलमानांशी जे घणघोर रणसंग्राम केले, त्यांपैकी कित्येक प्रसंगांवर मराठीत नाटकें झाली आहेत. शिव- छत्रपति, बाजी देशपांडे, बाजीराव-मस्तानी, संभाजी, पानपतचा मुकाबला, नरवीर मालुसरे, सवाई माधवरावाचा मृत्यु, कांचनग डची मोहना, गुणोत्कर्ष, महाराणा प्रतापसिंह, पद्मिनी वगैरे ऐतिहासिक नाटकें मनोरंजक व बोधपर असल्यामुळें तीं वाच- नीय आहेत. दोन रजपूत कन्या, राजाराम आणि साराऊ, पानपतचा दुर्दैवी मोहरा, विजयनगरचा डळमळीत राजमुकुट वगैरे नाटके 'किरात' नामक लेखकानें लिहिली असून तीं वाच- ण्यालायक आहेत. राणाभीमदेव हे नाटक शेरिडनच्या 'पिझारो' नामक नाटकाच्या आधारें लिहिलेले असून त्यावर इकडील पोशाख इतका सुंदर व बेमालूम चढविलेला आहे की, तें नाटक राजस्थानांतील एखाद्या रजपूत राजाचे असावें असा भास होतो. विदेशीय नाटकांचीं भाषान्तरें मराठींत बरीच झालीं आहेत. आंग्लनाटकाचार्य शेक्सपियर याच्या कित्येक नाटकांची मराठीत भाषांतरे झाली असून, कित्येक नाटके रंगभूमीवर येऊन लोकप्रिय झाली आहेत. लटपटपद्या, नवरदेवाची जोड- गोळी, कृपण धनाजीराव, अतिपीड चरित्र, अनुतापशमन, त्राटिका, तारा, मानाजीराव, विकारविलसित, झुंजारराव इत्यादि नाटके भाषान्तरें तर खरींच; परंतु तीं किती उत्तम झाली आहेत, याची साक्ष ती वाचल्यावर सहज पटणार आहे. कै. शंकर मोरो रानडे यांनी 'नाट्यकथार्णव' नामक मासिक पुस्तकांतून अनेक उत्तम नाटकें छापून प्रसिद्ध केली आहेत. अलिकडे नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, वगैरे महाराष्ट्र संतांची नाटके रंग-