पान:वाचन.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
वाचनं:

प्रस्तावनेत ग्रंथकर्ता आपल्या पुस्तकाविषयीं तें लिहिण्यास काय कारण झालें, तें कशाच्या आधारानें लिहिलें इत्यादि अनेक गोष्टींविषयीं उल्लेख करीत असतो. ज्याप्रमाणे एका गृहस्थाची दुसऱ्या गृहस्थाशी ओळख करून देतेवेळीं आपण त्या गृहस्था- विषयीं प्रथम थोडक्यांत माहिती सांगतों, त्याचप्रमाणे आपले पुस्तक जनसमूहापुढें मांडतांना ग्रंथकर्ता प्रस्तावनेत पुस्तकाविषयीं व विषयासंबंधाने बरीच माहिती सांगतो. एवढे पहाणें झाल्यावर त्या पुस्तकाविषयीं कोठें काय टीका झाली होती, ती वाचली असल्यास ध्यानांत आणावी किंवा पहावी. नंतर मधून मधून कांहीं पानें वाचून पहावीं, ह्मणजे आपणांस ग्रंथकाराची भाषा- सरणी, विचारसौंदर्य, वर्णनशैली, ह्रीं कशी काय आहेत, तें कळून येईल. जर ग्रंथकाराची भाषा नीरस असून विचार सौंदर्य, वर्णन शैली बाताबेताचीच असेल, दुसऱ्यांचे विचार मदतीस घेऊनच पुस्तक तयार करण्यांत आलें असेल, तर र्ते पुस्तक वाचण्यांत वेळ न घालविणें बरें ! ज्या पुस्तकाची भाषा चांगली असून ज्यांत ग्रंथकर्त्याचे स्वतःचे विचार व स्वतःचा अनुभव नमूद केला असतो, अशीं पुस्तकें वाचण्यालायक असतात. नांवाजलेल्या ग्रंथकारांचीं पुस्तकें बहुधा वाचनीय असतात. कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी प्रथम आपण तो चाखून पाहतों, चांगला लागल्यास खातों आणि वाईट लागल्यास निरुपयोगी ह्मणून टाकून देतों. तेंच तत्व पुस्तकांची निवड करितांना उत्तम रीतीनें लागू पडतें. चांगलीं पुस्तकें वाचण्यांत वेळ गेल्यास त्या वेळेचा सदुपयोग होऊन त्यापासून आपणास फायदा होतो. परंतु वाईट पुस्तकें वाचण्यांत जो वेळ जातो, तो आपण व्यर्थं दवडितो. इतकेच नाहीं, तर त्या वाचनापासून आपल्या मनावर अनिष्ट परिणाम होऊन आपले वर्तन बिघडण्याचाही संभव असतो,