पान:वाचन.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचन.

निरीक्षण करतो, त्यास ' अवलोकन ' असें ह्मणतात. अवलोकन करण्याची संवय सर्वास असते असें नाहीं. सर्व मनुष्ये रात्रंदिवस एकसारखे कांहीं तरी व्यवहार करीत असतात. परंतु, आपण काय करीत आहों, कशाकरितां करीत आहों, त्यापासून काय परिणाम होईल, हे असेच कां करावें किंवा कां करू नये, असे अनेक प्रश्न मनांत आणून आपल्या डोळ्यांपुढे ज्या गोष्टी घडत आहेत, त्यांजकडे विचारपूर्वक व शोधक दृष्टीने पहाणारे असे फारच थोडे लोक असतात. पुष्कळ लोक डोळ्यांनी पाहतात ब कानांनी ऐकतात, परंतु नुसत्या पहाण्या ऐकण्यापलीकडे किंवा काम करण्यापलीकडे ते मुळींच विचार करीत नसतात. अशा लोकांस अंतर्दृष्टि ह्मणजे काय, हें जन्मांतही कळत नाहीं. बाह्य- दृष्टीपेक्षां अंतर्दृष्टीची किंमत विशेष असून, तीपासून मनुष्याला यथार्थ व पुष्कळ ज्ञान प्राप्त होतें. मोठमोठे कवि, ग्रंथकार, मुत्सद्दी, तत्वज्ञानी, धर्मसंस्थापक यांना अंतर्दृष्टि विशेष असते; ह्मणूनच सामान्य जनांपेक्षां त्यांना विशेष तत्वज्ञान असतें; याच अंतर्दृष्टीमुळे त्यांचें विशेष तेज पडतें व ते महत्पद पावतात.
 सृष्टि ही शिक्षणाची मोठी शाळा आहे. या शाळेत मनुष्यास जें शिक्षण मिळतें, तें प्रत्यक्ष व आनुभविक असून, मोठमोठया पाठशाळेत मिळालेले शिक्षण त्यापुढे रद्द होय. मोठमोठे कवि, ग्रंथकार, योद्धे, राजकारणपटु व व्यवहारपटु लोक याच शाळेत अधिक शिकले आहेत. अवलोकनास आद्यस्थान द्यावयाचे याचें कारण हैं कीं, प्रत्यक्ष वस्तु पाहून व स्वत: विचार करून मनुष्य येथे ज्ञान संपादन करतो. ते मिळविण्यांत स्वतः परिश्रम केल्याने त्याची बुद्धि तीव्र होते व त्याला स्वतंत्र विचार कर याची हळूहळू संवय लागते. दुसन्यांचे उच्छिष्ट ज्ञान संपादन करण्यांत बुद्धीस फारसे वर्षण घडत नसल्यामुळे, सी विशेष