पान:वाचन.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचन.

त्याची सुखाची कल्पना उदात्त होत जाऊन 'आत्मवत् सर्वभूतानि ' या तत्वास अनुसरून मनुष्यमात्रांस तो आपणाप्रमाणें मानूं लागतो.
 मोत्याची किंमत त्याच्या पाण्यावर अवलंबून असते. जें मोतीं रुपया दोन रुपयांस मिळतें, तेंच पाणीदार असलें कीं, त्याची किंमत दसपट, वीसपट वाढते ! त्याचप्रमाणें मनुष्याचें आहे. मनुष्याची किंमत त्याच्या ज्ञानावर आहे. कित्येक विद्यार्जन करून ज्ञान संपादन करीत नाहींत, यामुळें जगांत त्यांची किंम- तही फारशी वाढत नाहीं. परंतु कित्येक अगाध ज्ञान मिळवून श्रेष्ठता पावतात. लोकांस त्यांचा अभिमान वाढून ते त्यांचे एक- सारखे गुणानुवाद गातात. पुष्कळ लोक त्यांच्या धोरणाने वागतात; त्यांची भाषणे ऐकण्यास फार आतुर असतात. ते गत झाल्यास सर्व लोक दुःखाने विव्हल होतात ! त्यांची स्मारकें करितात. परंतु दुसरे कित्येक लोक - अशांची संख्या हजारांनी किंवा लाखांनी असावयाची केव्हां जन्मतात, कोठें रहातात व केव्हां मरतात, याची कधी कोणी विचारपूससुद्धां करीत नाहीं ! याचें कारण हेंच कीं, नुसत्या मनुष्याची मुळींच किंमत नसून त्याच्या ज्ञानाची किंमत असते. पशुकोटींत मोजतां येतील इतके कित्येक लोक ज्ञानशून्य असतात व कित्येक देवकोटींत शोभतील एवढी त्यांची योग्यता असते. कित्येक ज्ञानपर्वताच्या शिखरी पोहोंच- तात व कित्येक अज्ञानपंकांत तसेच लोळत पडतात.
 आहार, निद्रा इत्यादि विकार जसे मनुष्यास असतात, तसेच पशूसही असतात. पशूपेक्षां मनुष्यास ज्ञानच काय तें अधिक असतें. पशुपक्ष्यांना परमेश्वरानें जी उपजत बुद्धि दिली आहे, तिच्या योगानें त्यांना आपणांपुरतें ज्ञान असतें. आहार, निद्रा, भय त्यादि विकार त्यांना कळत असून ते तेवढ्यापुरती तरतूद