Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७२ होती; १९७० साली ती १४१२ झाली. लौकरच ती तीन हजारांवर गेली. या कर्मचाऱ्यांचे जास्तीत जास्त हित कसे होईल, ह्याकडे वसंतरावांनी नेहमीच लक्ष दिले. त्यांचा कामगारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रथमपासूनच खूप पुरोगामी होता. शिक्षणाला वसंतरावांनी कायम महत्त्व दिले होते व शिक्षण म्हणजे शाळा-कॉलेजात मिळते तेच नव्हे ह्याची त्यांना जाणीव होती. वेगवेगळ्या प्रकारची व्यावसायिक कौशल्ये आपल्या कामगारांमध्ये निर्माण व्हावीत, आपापल्या कामात त्यांनी अधिकाधिक वाकबगार व्हावे ह्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यायची खास यंत्रणा वसंतरावांनी उभी केली. आपले काम त्यांना कमीत कमी हालचाली करून, श्रमांचा व्यर्थ व्यय न होता चोख करता यावे, त्यादृष्टीने खास विचार करून वर्कशॉपची रचना केली. वेगवेगळी उपकरणे योग्य प्रकारे कशी वापरायची, त्यातून आपल्या कामाचा दर्जा कसा उंचावायचा, बिघाड नेमका कुठे आहे, ते कसे शोधायचे व त्याचे निराकरण अचूकपणे व कमीत कमी वेळात कसे करायचे वगैरेचे त्यांना शिक्षण दिले. कामाच्या जागी स्वच्छ, प्रसन्न वातावरण राहील, याची दक्षता घेतली. मुख्य म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. कंपनीचे नाव मोठे होत गेले तसतशी तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही प्रतिष्ठा लाभू लागली. कर्मचाऱ्यांना नियमित बचत करायची सवय लागावी आणि त्याचबरोबर अडीअडचणीला कर्जही मिळावे म्हणून कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था सुरू करण्यात वसंतरावांनी पुढाकार घेतला. कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात धान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून आवारातच एक किराणा वस्तू विक्री केंद्र काढले. स्वच्छ व प्रशस्त असे उपाहारगृह काढले. अत्यल्प किमतीत तिथे चांगले खाद्यपदार्थ मिळतील; ह्याची व्यवस्था केली. वसंतराव स्वतः लहानपणापासूनच क्रीडाप्रेमी होते व आपल्या कर्मचाऱ्यांमध्येही खेळांची आवड निर्माण व्हावी ह्यासाठी प्रयत्नशील होते. आपल्या कामगारांनाही वेगवेगळ्या खेळांत त्यांनी प्रावीण्य संपादन करावे म्हणून वसंतराव खास सवलतीही देत. कामगारांचा स्पोर्ट्स क्लब होता. दरवर्षी कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेटचे सामने आयोजित केले जात. कोल्हापुरातील इतरही संघांना, तसेच बाहेरगावच्या संघांनाही सहभागी होता येईल, अशीही एक सामन्यांची मालिका असे व त्यात यशस्वी होणाऱ्या संघाला घाटगे- पाटील ट्रॉफी दिली जाई; जी खूप प्रतिष्ठेची मानली जाई. कर्मचाऱ्यांचे वसंतवैभव | ८६ ।