Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बसमधून उतरत. त्यांचे सामान आधी काढले जाई व बस पूर्ण धुऊन झाल्यावर पुन्हा जागच्या जागी ठेवले जाई. वाटेत जिथे चांगली खाण्यापिण्याची सोय असेल अशा ठिकाणी थांबे असत. रस्ते खराबच होते; पण तरीही बस वाहतूक अगदी सुरक्षित होती. चालक-वाहक युनिफॉर्म घालणारे. प्रवाशांशी नम्रपणे वागणारे. बसेसची नावेही पंचगंगा, इंद्रायणी, कावेरी, गोदावरी, सरस्वती अशी मोठी सुरेख होती. बघता बघता ही बससेवा खूप लोकप्रिय झाली. कारवारमध्ये राहणारी अनेक मंडळी मुंबईत नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने राहत होती. सणासुदीला वा सुट्ट्यांमध्ये त्यांना आपापल्या गावी जायची ओढ असायची. कोकण रेल्वे त्या वेळी सुरू झाली नव्हती व ह्या मार्गावरून जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी घाटगे-पाटील हा पहिला पर्याय होता. घाटगे-पाटील बोर्ड लावलेल्या बसेस लौकरच कोल्हापूर, मंगलोर, मुंबई या दरम्यान इतरही मार्गांवर धावू लागल्या. चंद्रावर प्रथम पाऊल ठेवणारा अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग ज्यावेळी मुंबईत आला व त्याची एक प्रचंड शोभायात्रा काढली गेली, तेव्हा त्या यात्रेत भाग घेणारे घाटगे-पाटील कंपनीच्या बसेसमधूनच जात होते आणि म्हैसूरमध्ये जेव्हा दसऱ्याच्या सणानिमित्त मोठा महोत्सव व्हायचा, तेव्हा त्यासाठीही घाटगे-पाटलांच्या बसेसच प्रवाशी वाहतुकीसाठी वापरल्या जात होत्या. वेगवेगळ्या वाहनांच्या विक्रीची एजन्सी घाटगे-पाटलांनी घेतली होती हे मागील प्रकरणात आलेच आहे. ही विक्री वाढत जावी म्हणून अनेक अभिनव उपक्रम राबवले जात. उदाहरणार्थ, त्यातलाच एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे त्यांनी स्थापन केलेला 'दक्षिण महाराष्ट्र लँब्रेटा क्लब'. आपले वेगवेगळे डीलर्स काय काय उपक्रम राबवत आहेत ह्याचा विस्तृत वृत्तान्त एपीआय कंपनीमार्फत नियमित स्वरूपात लँब्रेटा कंपनीकडे इटलीला जात असे. मूळ इटालियन कंपनीचे लक्ष आकर्षित करावे म्हणून ज्यांनी ज्यांनी घाटगे-पाटलांकडून लँब्रेटा स्कूटर्स खरेदी केल्या होत्या, त्यांचा हा उपरोक्त क्लब मूळ कंपनीच्या पुढाकारातूनच स्थापन केला गेला. त्यांचे स्नेहमेळावे भरवले जात. आपापल्या स्कूटर्सवरून त्यांच्या रत्नागिरी, गोवा अशा दूरच्या ठिकाणी सहली निघत. सर्व स्कूटरस्वार एकामागोमाग एक मोर्चाप्रमाणे रस्त्यावरून जात आहेत व सोबत त्यांच्या क्लबचा एक झेंडाही फडकतो आहे हे दृश्य जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष पटकन वेधून घेत असे. विशेष म्हणजे ह्या उद्योगभरारी | ७७ ।