Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नंतरच्या त्या भेटीत 'तुम्ही आमचे डेक्कन स्टेट्ससाठी सब- डिस्ट्रिब्युटर बनाल का?" असा प्रश्न फ्रेंच मोटर कंपनीच्या वतीने त्या दोघांनी वसंतरावांना विचारला. वसंतराव अशा संधीची वाटच पाहत होते. लगेचच त्यांनी होकार दिला. अशा प्रकारे मॉरिस मोटारींची एजन्सी घाटगे-पाटलांकडे आली. लौकरच त्यांना मॉरिस कमर्शिअल ह्या ट्रकचीही एजन्सी मिळाली. भारतात आलेला मॉरिस कमर्शिअल हा पहिला डिझेल ट्रक. कलकत्त्याच्या सेन आणि पंडित कंपनीकडेही त्या वेळी लँडमास्टर मोटारी व बेडफोर्ड ट्रक्सची डीलरशिप होती. सेन आणि पंडित कंपनीशी संपर्क साधून त्यांचीही एजन्सी घाटगे-पाटलांनी मिळवली. आय. जी. पी. खान बहादूर सादरी यांनी कोल्हापूरच्या पॉलिटिकल एजंटकडे घाटगे-पाटलांच्या नावाची शिफारस केली होती व त्यामुळे विक्रीसाठी त्यांना अमेरिकेतील जनरल मोटर्स बनवत असलेल्या डॉज मोटारींचा व ट्रक्सचा आणखी विशेष कोटा मंजूर झाला. हे तेच सादरीसाहेब ज्यांच्यासाठी पूर्वी घाटगे-पाटलांनी बॉडी बिल्डिंग व्यवसायात पदार्पण करताना उत्तम पोलीस व्हॅन्स बांधून दिल्या होत्या. एका व्यवसाय क्षेत्रातील चांगल्या कामगिरीचा फायदा घाटगे-पाटलांना असा दुसऱ्या व्यवसाय क्षेत्रातही मिळत होता. देशातील विदेशी मोटारींच्या बड्या डिस्ट्रिब्युटर्सनादेखील देशभर आपापल्या गाड्या विकण्यासाठी विक्रेते हवेच होते. कारण प्रश्न फक्त वाहनांच्या विक्रीचा नसायचा, तर विक्रीनंतरची सेवा देणे, हेही अत्यावश्यक होते. तसे पहिले तर त्या काळात प्रत्येक गोष्टीचा देशात इतका तुटवडा होता, की कोणीही उत्पादक आपले उत्पादन विकू शकत होता; कारण एकूणच सगळे सेलर्स मार्केट होते. वाहनांकरिता लांबलचक प्रतीक्षा यादी असायची आणि दीर्घ काळ वाट पाहावी लागायची. त्यामुळे विक्रीचा प्रश्न अवघड नव्हता; पण वाहन विकल्यानंतरची सर्व्हिस देणे हे अधिक अवघड होते. मोठ्या शहरात राहून देशाच्या कानाकोपऱ्यात तशी सर्व्हिस देणे बड्या डिस्ट्रिब्युटर्सना स्वतःला शक्य नव्हते. त्यामुळे छोट्या छोट्या शहरांतही त्यांना एजन्सीज द्यायच्याच होत्या. एकेकाळी मोटारींना फक्त बड्या शहरांतून मागणी असायची; देशात थोडाफार पैसा जो होता तो तिथेच होता; पण महायुद्धानंतरच्या काळात वसंतवैभव । ६० ।