Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यामुळे एकूण मार्केट वाढू लागले व नव्या डीलर्सना विक्रीक्षेत्रात वाव मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली. अर्थात मोटारींच्या विक्रीसाठी विशिष्ट कोटा ठरलेला असे; कारण आयातीसाठी परकीय चलन अगदी मर्यादित प्रमाणात उपलब्ध होते. कोल्हापूरसह डेक्कन स्टेट्स ह्या विभागासाठी असाच मोटारींचा विशिष्ट कोटा असायचा व तो गि-हाइकासाठी मंजूर करायचे काम कोल्हापूरचा ब्रिटिश रेसिडेंट करत असे. ती मंजुरी मिळाल्याशिवाय कोणीच वाहन खरेदी करू शकत नसे किंवा विकूही शकत नसे. ब्रिटिश रेसिडेंटने आपल्या विभागात काही मॉरिस मोटारींच्या विक्रीसाठी अनुमती द्यायचे ठरवले. ही बातमी वसंतरावांच्या कानावर गेली. आपले स्वप्न पुरे करायची वेळ आली आहे, हे वसंतरावांनी हेरले व त्या दिशेने पहिले पाऊल म्हणून ते मुंबईत गिरगावात फ्रेंच मोटर कार कंपनीत गेले. नावात फ्रेंच असले तरी ही इंग्लिश कंपनी होती. ह्या कंपनीकडे मॉरिस मोटारी विकायची एजन्सी होती. ह्या फ्रेंच मोटर कार कंपनीशी वसंतरावांचा उत्तम परिचय होता. कारण त्यांच्याकडे जे चार ट्रक्स होते त्यापैकी एक ट्रक हा 'इंटरनॅशनल' होता व ट्रक्सचा हा ब्रँड हीच कंपनी विकायची. तिचे पार्ट्स विकत घेण्यासाठी वसंतरावांना खूपदा त्यांच्याकडे जावे लागे. इतर ग्राहकांपेक्षा वसंतराव खूप वेगळे दिसत; त्यांच्या एकूण सुशिक्षित सफाईदार व्यक्तिमत्त्वाचा समोरच्यावर लगेच प्रभाव पडे. ह्या व्यवसायात त्यांच्यासारखी माणसे त्या काळी थोडीच असायची. आपल्याला हवा असलेला पार्ट कंपनीच्या विक्री काउंटरवर मिळाला नाही, म्हणून अधिक चौकशी करायला एकदा वसंतराव मागील बाजूस असलेल्या त्यांच्या कार्यालयात गेले. इतर कुठल्या कनिष्ठ अधिकाऱ्याला भेटण्यापेक्षा त्यांनी तेथील सर्वांत वरिष्ठ अधिकारी कोण आहेत ह्याची चौकशी केली व त्यांचीच थेट भेट घेतली. लांबून आलेले गि-हाईक म्हणून कदाचित त्यांना ती संधी मिळाली असावी; कारण एरव्ही इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणे सोपे नव्हते. अशा प्रकारे कंपनीचे भारतातील जनरल मॅनेजर इ. पॉटर व असिस्टंट मॅनेजर लोपेस यांच्याशी वसंतरावांची प्रथम ओळख झाली. आपल्या सवयीप्रमाणे वसंतरावांनी ती मैत्री पुढे आवर्जून वाढवली. वसंतरावांचा गप्पिष्ट स्वभाव, बहुश्रुत व्यक्तिमत्त्व, धडाडी, कष्ट करायची तयारी वगैरे गुण त्या दोघांनाही खूप भावायचे आणि एकू दोघेही वसंतरावांवर खूश होते. गाडी सुरू करताना । ५९ ।