Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधारभूत थरून आणि सरकारी आश्रयानेच उभा राहिला होता. मुख्यतः इथला कापूस इंग्लंडमध्ये न्यायचा आणि तेथील कापड गिरण्यांमध्ये तयार झालेले कापड भारतात आणून भरपूर नफा घेऊन विकायचे, हेच साधारण धोरण होते व अन्य सर्वच व्यवसायांत तोच साचा मूलभूत होता. वेगवेगळ्या यंत्रसामग्रीचे वा उपकरणांचे महत्त्वाचे घटक परदेशातून आयात करायचे आणि त्यांची इथे फक्त जोडणी करून ते विकायचे. देशातील चहा, कॉफी, नीळ, ऊस, रबर यांचे मळे किंवा लोखंड, मँगनीज, कोळसा यांच्या खाणी हे मुख्यतः इंग्लिश उद्योगांना लागणारा कच्चा माल कमीत कमी दरात व नियमित स्वरूपात पुरवणारे त्यांचे हक्काचे स्रोत होते. भारतासारख्या वसाहतीतून स्वस्तात स्वस्त दराने जास्तीत जास्त कच्चा माल मिळवायचा आणि त्यावर इंग्लंडमध्ये प्रक्रिया करून तयार होणारा पक्का माल पुन्हा भारतात आणून जास्तीत जास्त किमतीला विकायचा ह्या मूलभूत धोरणावरच सगळा युरोपियन वसाहतवाद उभा होता. शेतकरीनेते शरद जोशी यांनी भारतातील उद्योगक्षेत्राचे वर्णन करताना 'चैत्रगौरीची कारखानदारी' असा शब्दप्रयोग केला होता तो सार्थच होता. ही आर्थिक गुलामगिरी राजकीय गुलामगिरीइतकीच जाचक होती. महात्मा गांधींनी आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रतीक म्हणून एका साध्या चरख्याची निवड केली ती त्याचमुळे. 'चरखा चला चला के, लेंगे स्वराज्य लेंगे' हा स्वावलंबनाचा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा नारा होता. दरडोई उत्पन्न अगदी कमी असल्याने मुंबई व कलकत्त्यासारखी मोठी शहरे सोडली, तर देशातील एकूण बाजारपेठ अगदी सीमित होती. अलीकडच्या काळात व्यापाराचे जागतिकीकरण झपाट्याने होत गेले आहे व त्यामुळे परदेशी वस्तूंनी देशातील बाजारपेठ ओसंडून वाहते आहे, असे साधारण चित्र दिसते. वेळची परिस्थिती आजच्याहूनही कितीतरी अधिक भयानक होती. देश फार मोठ्या प्रमाणावर आयातीवरच अवलंबून होता. अगदी चॉकलेट आणि बिस्किटे, पेन्सिली आणि वह्या, टाचण्या आणि पिना यांसारख्या सर्वसामान्य गोष्टीसुद्धा परदेशाहून आयात केल्या जात. साधारण सुखवस्तू कुटुंबात वापरले जाणारे टोमॅटो केचप, जॅम, बटर, वेफर्स, कॉर्नफ्लेक्स, साखरेचे क्युब्स, साबण, शाम्पू, ब्रिल्क्रीम, टूथपेस्ट, परफ्युम्स, कपडे, फर्निचर, दिवे, खेळणी यांसारखे अगणित पदार्थ हे सर्रास इम्पोर्टेड असत. विजेची उपकरणे, मोठी यंत्रे, स्वयंचलित वाहने ह्या तर फार दूरच्या गोष्टी झाल्या; त्या तर हमखास इम्पोर्टेड असत. वसंतवैभव । ५० ।