पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्यायचे. नुसताच वेळ द्यायचे असं नव्हेतर आम्ही सध्या काय करत आहोत, काय काय करण्यासारखं आहे वगैरेची चर्चाही ते करायचे. मी १९८३ साली जेव्हा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला, तेव्हा नेमकी कुठली ब्रँच मी निवडावी ह्याविषयीही ते माझ्याशी बोलले होते. मी इलेक्ट्रॉनिक्स आणि कंप्यूटर सायन्स करावं हा त्यांचाच सल्ला होता. त्यांच्या मते ह्या क्षेत्रांना भविष्यात अधिक वाव असणार होता. पी. एस. देवधर यांच्यासारखे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातले तज्ज्ञ त्यांचे मित्र होते. पुढे देवधर हे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही झाले. त्यांच्यासारख्यांना मी भेटावं अशी वसंतकाकांची इच्छा असे. त्या काळी इंटरनेट नव्हतं; पण जगात जे जे नवं संशोधन चाललं आहे त्याची त्यांना माहिती असायची. जगभरातली प्रमुख बिझिनेस आणि वैज्ञानिक मॅगझिन्स ते घेत असत आणि वाचत असत. पुढे शिक्षण झाल्यावर मी कुठे नोकरी वगैरे न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा हादेखील त्यांचाच आग्रह होता. त्यांची जिद्द, चिकाटी, नव्या नव्या क्षेत्रांविषयी त्यांना असलेलं कुतूहल आणि ज्ञान हे सारं विशेषच होतं; पण मुख्य म्हणजे आमच्या करिअरमध्ये ते मनापासून इंटरेस्ट घेत. माझ्यापुढे ते एखाद्या रोल मॉडेलप्रमाणेच होते व त्यांच्याकडे बघताबघताही खूप काही शिकायला मिळे. स्वतःच्या बळावर काहीतरी नवीन करायची प्रेरणा मला त्यांच्यापासून मिळाली. " त्यांनी ज्या काळात व्यवसाय केला तो काळ जर डोळ्यापुढे आणला, तर त्यांचं मोठेपण अधिकच जाणवतं. आमची पिढी त्यामानाने खूप सुदैवी आहे. आमच्या वेळी घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती, जवळ पुरेसा पैसा होता, परदेशी जाऊन शिक्षण घेणं परवडणारं होतं. अनेक अर्थांनी सगळं आम्हांला अनुकूल होतं. कुठलाही धंदा म्हटला म्हणजे अडचणी तर काय, कायमच असतात; पण त्यांनी सुरुवात केली तेव्हा फारच बिकट परिस्थिती होती. ती विचारात घेतली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचं काम विचारात घेतलं, तर आमच्यापेक्षाही ते व्यवसायात अधिक यशस्वी ठरले असंच म्हणावं लागेल." दुसरे उदाहरण म्हणजे मीना आणि दीपक गद्रे यांचे चिरंजीव अर्जुन, मुलांच्या शिक्षणामुळे अर्जुन राहतात गोव्याला; पण रत्नागिरी, गुजरातेतील चोरवाड आणि कर्नाटकातील ब्रह्मावार येथील आपल्या तिन्ही आस्थापना अतिशय कर्तबगारीने सांभाळतात. गद्रे मरीन एक्स्पोर्ट वारसा वसंतरावांचा | २३३ |