पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाली होती आणि तीही शेवटपर्यंत कायम होती. मागे लिहिल्याप्रमाणे त्यांचे बंगलोरमधील मोठे बंधू विष्णुपंत स्वतः उत्तम गोल्फ खेळत. वसंतराव बंगलोरला जात, तेव्हा तेही विष्णुपंतांबरोबर गोल्फ बघायला जात; पण त्या वेळी ते प्रत्यक्ष गोल्फ खेळत मात्र नसत. तो योग आला ते इंग्लंडमध्ये गेले असताना. वसंतरावांना गोल्फची आवड निर्माण झाली ती त्यांचे एक चुलत चुलत भाऊ डॉ. पी. एस. ऊर्फ पांडुकाका घाटगे यांच्यामुळे. पांडुकाका शिकण्यासाठी म्हणून लंडनला गेले व नंतर तिथून टांझानियामध्ये गेले. त्यांना गोल्फचे अतोनात वेड. कोल्हापुरातदेखील गोल्फ क्लब चालू करायला हवा असे त्यांना फार वाटे. पांडुकाकांची मुले लंडनमध्ये शिकत होती व तिथे त्यांचे एक घरही होते. वसंतरावांची मुलगी नलिनी आणि जावई महेश लंडनमध्ये असताना वसंतराव आणि जयकुमार तीन-चार वेळा त्यांच्याकडे गेले होते व तिथेच पांडुकाकांनी त्यांच्यापाशी हा कोल्हापुरात गोल्फ क्लब सुरू करायचा विषय काढला. सुरुवातीला वसंतरावांचा त्याला विरोध होता. कारण खेळासाठी खूप मोठी जागा लागायची, त्यासाठी लागणारे सामान परदेशाहून यायचे व म्हणून खूप महाग असायचे आणि पुन्हा हा खेळ खूप वेळखाऊ होता चांगला तीन- चार तास चालायचा. त्या वेळी मग पांडुकाकांनी हा विषय पुढे रेटला नाही; पण पुढे जेव्हा कोल्हापुरात खरोखरच गोल्फ क्लब सुरू झाला तेव्हा पांडुकाकांना सुखद धक्काच बसला. छत्रपती शहाजी राजे गोल्फचे शौकीन होते. त्यांनी जनरल थोरात यांच्या मध्यस्थीने लष्कराकडून गोल्फ क्लबसाठी आर्मीच्या ताब्यातली जागा मिळवली. कोल्हापूर व सांगलीचे काही उद्योजक आणि पुण्याचे एक गोल्फप्रेमी चंद्रकांत किर्लोस्कर यांनीही मदत केली. त्यांच्या पुढाकारातून पुणे, हुबळी, हरिहर, बंगलोर इथले खेळाडू कोल्हापूरला गोल्फ खेळायला येऊ लागले. वसंतराव आणि जयकुमारदेखील मग गोल्फ खेळू लागले आणि पुढे त्या खेळाची त्यांना खूप आवडही निर्माण झाली. अगदी अखेरअखेरपर्यंत वसंतराव नियमित तिथे गोल्फ खेळायला जात. खेळतानाही ते गंभीरपणे खेळत, कसेतरी वेळ घालवण्यासाठी खेळायचे अशी त्यांची वृत्ती नव्हती. जाताना ते नेहमीच गोल्फ खेळतानाचा विशिष्ट ड्रेस घालत असत व घरच्या मुलांना त्याचे आकर्षण होते. वसंतवैभव | २२० ।