Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एपीआय ही कंपनी मद्रासच्या एम. ए. चिदंबरम उद्योगसमूहाची होती. त्यांच्याकडे लँब्रेटा कंपनीकडून त्यांनी विकत घेतलेले लँब्रेटा ब्रँडच्या तीन स्वयंचलित वाहनांचे तंत्रज्ञान होते - १५० सीसीच्या स्कूटर्स, थ्री व्हीलर्स आणि त्याशिवाय ४८ सीसी क्षमतेची छोटी स्कूटर, जिला ऑटोसायकल म्हटले जाई. त्या काळात उद्योगक्षेत्रात प्रत्येक उत्पादनासाठी भारत सरकारचा परवाना लागायचा. भारत सरकारने एपीआयला ह्या तीनपैकी कुठलीही दोन उत्पादने बनवायची अनुमती दिली. एपीआयने ज्यांना भारतात भरपूर मागणी होती अशी पहिली दोन उत्पादने निवडली व तिसरे ऑटोसायकल हे उत्पादन तसेच मागे ठेवून दिले. एपीआयच्या मद्रास येथे होणाऱ्या महत्त्वाच्या परिषदांना त्यांचे एक मोठे डीलर ह्या नात्याने वसंतराव हजर राहत असत. १९७०च्या आसपास भरलेल्या अशाच एका परिषदेत वसंतरावांना ही माहिती मिळाली. चिदंबरम समूहाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी वसंतरावांचा पूर्वपरिचय होता. त्यांच्याशी संपर्क साधून वसंतरावांनी ऑटो सायकल बनवायचे तंत्रज्ञान घाटगे-पाटील कंपनीला विकत मिळेल का अशी विचारणा केली. चिदंबरम समूहाने होकार दिला व त्या दृष्टीने मग घाटगे-पाटलांनी हालचाली सुरू केल्या. घाटगे-पाटील कंपनीने स्कूटरनिर्मितीच्या व्यवसायात उतरायचे ठरवले त्याला साधारण ही पार्श्वभूमी होती. आदली कित्येक वर्षे ते लँब्रेटा स्कूटर्स विकतच होते; पण आता त्या स्कूटर्स फक्त विकण्याऐवजी त्यांनी स्वतःच तशाच धर्तीच्या ऑटो सायकल्स (त्यांना स्कूटरेट असेही म्हटले जाई) बनवायचे ठरवले. ही मोठी हनुमान उडीच होती. दुसऱ्या कोणीतरी असेम्बल केलेल्या स्कूटर्स विकणे आणि स्वतः तशा स्कूटर्स तयार करणे हे दोन अगदी भिन्न असे व्यवसाय होते. सर्वप्रथम घाटगे-पाटलांनी आपले जुने स्नेही आणि सहकारी असलेल्या किर्लोस्कर समूहाशी ह्याबद्दल चर्चा केली. त्यांनाही ह्या उत्पादनात रस वाटला. यासाठी किर्लोस्कर घाटगे पाटील ऑटो लिमिटेड (KGP) ही एक नवी कंपनी घाटगे-पाटील आणि किर्लोस्कर यांनी एकत्रित येऊन सुरू केली. उचगाव येथे घाटगे पाटलांनी बरीच मोठी जमीन घेतलेली होती व तिथे घाटगे-पाटील इंडस्ट्रीजची फौंड्री बांधल्यावरही बरीच जागा शिल्लक होती. त्याच जागी केजीपी कंपनी सुरू झाली. वसंतवैभव | २०२ ।