Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वगैरे गोष्टींकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळच उरत नाही. त्यातून एखादवेळी तुम्ही लवकर घरी आलात, तरी इतके दमलेले असता, की घरगुती गोष्टींकडे लक्ष देण्याइतका उत्साह उरलेला नसतो. ह्या सगळ्याचा दुष्परिणाम एकदम नाही; पण हळूहळू निश्चित जाणवू लागतो. आणि मग घर आणि कुटुंब हा जीवनातील आनंदाचा झरा न ठरता उलट अंतर्मनात कायम ठसठसत राहणारा काटा बनून जातो. बाहेरच्या जगात खूप यशस्वी ठरलेली; पण कौटुंबिक आघाडीवर खूप दुःखी असणारी, अनेक प्रतिभावान आणि कर्तृत्ववान माणसे जगात पाहायला मिळतात. वसंतरावांच्या बाबतीत असे घडले नाही, बाहेरच्या जगात भरारी मारण्यासाठी त्यांच्या पंखांना कायम बळ देणारे कौटुंबिक स्वास्थ्य त्यांच्या नशिबी आले, ह्याचे मोठे श्रेय माईंना द्यावे लागेल. माई माहेरच्या गलगली कुटुंबातल्या. हे कुटुंब मूळ बेळगावचे. तिथल्या ठळकवाडीत त्यांचे घर होते. माईंचे वडील आप्पाचार्य भिमाद्री गलगली ह्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते. त्यांना आप्पाण्णा म्हणत. काही वर्षांनी सरकारी वकील (पब्लिक प्रॉसेक्युटर ) म्हणून त्यांची निवड झाली. मुख्यतः ते रेल्वेच्या केसेस लढवायचे. त्यादृष्टीने सोईचे म्हणून ते पुण्याला आले. तिथे त्यांना सरकारी घरही मिळाले. त्यांना दोन मुली - उषा (माहेरचे नाव लीला) आणि प्रमिला. दोघी अगदी लहान असतानाच, १९२३ साली, त्यांची जन्मदात्री आई (त्यांचे नाव कमल) वारली. त्या वेळी उषा व प्रमिला यांची वये सात व चार एवढीच होती. त्यानंतर गलगली यांनी दुसरे लग्न केले. इंदिराबाई या त्यांच्या दुसऱ्या पत्नी. दुसऱ्या लग्नापासून गलगली यांना अपत्य झाले नाही. इंदिराबाईंनी लीला आणि प्रमिला ह्या दोन्ही मुलींचे अगदी प्रेमाने, सख्ख्या मुलींप्रमाणेच संगोपन केले. वसंतरावांचे मोठे बंधू सखारामपंत ऊर्फ तात्या यांच्याशी लीला ह्या मोठ्या मुलीचे लग्न १९३४ साली झाले व त्यामुळे गलगली व घाटगे कुटुंबे एकत्र जोडली गेली. त्या लग्नात वसंतराव आणि प्रमिला यांचा प्रथम परिचय झाला. त्या वेळी प्रमिलेचे वय केवळ १४ होते. आपल्या मोठ्या बहिणीकडे म्हणून प्रमिला कधीकधी कोल्हापूरला यायची व त्या वेळीही वसंतरावांची व तिची भेट होत असे. पण दोघांचा अधिक परिचय झाला तो वसंतराव १९३८ साली पुण्याला फर्ग्युसन कॉलेजात एमएस्सी करत असताना व नंतर तिथेच बॉटनी वसंतवैभव । १८० ।