Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काळात कारखान्याची प्रचंड वाढ केली गेली व नादुरुस्त झालेल्या अमेरिकन विमानांची दुरुस्ती इथे होऊ लागली. विमानांचे संपूर्ण ओव्हरहॉलिंगदेखील इथे व्हायचे, तसेच भारत व ब्रम्हदेशात त्या काळात वापरल्या जाणा-या दोस्त राष्ट्रांच्या सगळ्या विमानांसाठी इथे सुटे भाग बनत. अमेरिकन हवाईदलाचा मोठा तळ इथे होता. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर भारत सरकारला ह्या कारखान्याचा ताबा दिला गेला. १९४२ साली ब्रिटिश सरकारने कंपनीचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर येथील नोकरी सोडून विष्णुपंत पुन्हा अध्यापनक्षेत्रात गेले होते. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये एरोनॉटिक्स विषय शिकवू लागले होते. भारतात सर्वप्रथम ह्या विषयाचा पदव्युत्तर डिप्लोमा कोर्स त्यांनीच ह्या संस्थेत सुरू केला. १९४८ साली भारत सरकारकडे पुन्हा हिंदुस्तान एअरक्राफ्टचा ताबा आल्यानंतर चीफ डिझायनर म्हणून ते तिथे रुजू झाले. Harlow PC-5 हे तिथे तयार झालेले पहिले विमान. त्यानंतर भारतातील, किंबहुना दक्षिण आशियातील, पहिले लढाऊ-बॉम्बर विमान HF-24 मरुत हे देखील ह्याच कारखान्यात तयार झाले. त्याचे डिझाइन जर्मन इंजिनिअर कूर्ट टंक (KurtTank) याने व विष्णुपंतांनी एकत्रितरीत्या तयार केले होते. आज तिथे एअरक्राफ्ट, जेट इंजिन्स, हेलिकॉप्टर्स आणि या सगळ्यांचे स्पेअर पार्ट्स तयार होतात. १९६४ साली कंपनीचे नाव हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड ठेवले गेले व तिचे जनरल मॅनेजर म्हणून विष्णुपंतांची नेमणूक झाली. फ्लाइंग क्लब्ससाठी वापरले जाणारे HT2 हे विमान, हवाई दलातील वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ वापरले जाणारे Hindustan Jet Trainer ऊर्फ HJT 16 हे विमान, तसेच पुष्पक (वाहतुकीसाठी) आणि कृषक (शेती फवारणीसाठी) ही आणखी दोन मॉडेल्स त्यांनीच डिझाइन केली. भारत- पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या नॅट (Gnat) विमानांच्या निर्मितीतही त्यांचा मोठा वाटा होता. भारत सरकारने १९६५ साली पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला होता. १९७० साली ते निवृत्त झाले. 'भारतीय विमान उद्योगाचे पितामह' म्हणून त्यांची सार्थ ओळख आहे. उतारवयात उत्तम चित्रकार म्हणून त्यांनी नाव मिळवले. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांना गती होती. बंगलोरच्या सामाजिक जीवनातही त्यांना खूप मानाचे स्थान होते. अशा अष्टपैलू विष्णुपंतांचे ६ डिसेंबर कुटुंबातले वसंतराव | १४३ |