पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हाच प्रमुख मुद्दा झाला !! आणि जे सर्व भारतीय पक्षांच्याबाबत घडले ते कम्युनिस्ट पक्षाच्याबाबत घडून आले. म्हणजे कम्युनिस्ट पक्षसुद्धा अनेक गटांत विभागला गेला. आज ज्या अवस्थेत आपण स्वातंत्र्यानंतर तीस वर्षांनी आहोत या अवस्थेत कम्युनिस्टांना लोकशाही निवडणुकांच्या मार्गाने मध्यवर्ती सत्ता ताब्यात घेण्याची शक्यता नजिकच्या काळात वाटत नाही

नव्याने चिंतन

सशस्त्र उठाव याणि क्रांती याला यश येण्याची शक्यता दिसत नाही. निवडणुकांच्या मार्गाने सत्ता काबीज करण्याची शक्यता दिसत नाही. या अवस्थेत कम्युनिस्ट पक्षातील कार्यकत्यांचे नव्याने चिंतन सुरू झालेले आहे. वर्ग-वर्ण एकत्र लढ्याची भूमिका ही या कम्युनिस्ट कार्यकत्यांच्यासाठी नवी आहे. उरलेल्या समाजवाद्यांच्यासाठी ही भूमिका फार जुनी आहे. उद्या जर कुणी असे म्हणू लागला की आता डॉ. बाबा आढाव सुद्धा वर्ग-वर्ण एकत्र लढयाच्या भूमिकेवर आलेले आहेत किंवा जर कुणी असे म्हटले की कुरुंदकरांना ती भूमिका आता मान्य झालेली आहे तर त्याला माझे उत्तर इतकेच राहील की, डॉ. लोहिया यांच्या विवेचनात जागोजाग ही भूमिका अगदी आरंभापासून दाखवता येते. स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा समाजवाद्यांच्यामध्ये ही भूमिका दाखवता येते. स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विवेचनातसुद्धा ही भूमिका आलेली आहे. कम्युनिस्ट सर्व सामान्यपणे या भूमिकेकडे दुर्लक्ष करीत होते, पण महाराष्ट्रात कॉ. गोदावरी परुळेकर आणि केरळमधील काही कार्यकर्ते यांच्या कार्यपद्धतीत ही भूमिका गृहीतच होती. सर्व समाजवाद्यांना जे नेहमीच मान्य होते, पण व्यवहारात आणता आले नाही आणि काही कम्युनिस्टांच्या व्यावहारिक राजकारणात जे गृहीत होते, पण तत्त्व म्हणून जे त्यांना मान्य नव्हते असे हे या वर्ग-वर्ण एकत्र लढयाचे स्वरूप आहे. आपण वर्ग-वर्ण एकत्रित लढा असे सतत बोलतो, पण राजकारणात या मुद्याकडे का वळावे लागते हे सांगण्याचे मात्र टाळतो आहोत. सत्य

२०।