पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिस्थिती अशी आहे की निवडणुकीच्या राजकारणात धर्म आणि जाती या शक्ती अतिशय प्रभावी ठरत आहेत. ही गोष्ट या देशात पुरोगामी राजकारणाशी संबंध असणान्या सर्वांनाच हळूहळू लक्षात येऊ लागली आहे. राजकारणावर असणारा धर्म आणि जातींचा प्रभाव पुरेसा वक्र माणि गुंतागुंतीचा आहे. ज्या जातीचे बहुमत एखाद्या मतदार संघात आहे, त्या जातीचा माणूस त्या मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता पुष्कळच असते हे खरे आहे, पण बहुसंख्य जातीचा उमेदवार निवडून येतोच हे मात्र खरे नाही. मतदाराची जात कोणती आणि उमेदवाराची जात कोणती, हा मुद्दा गौण ठरावा असे काही घटक राजकारणात असतात. यांतील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते. आपापल्या जातीच्या मतदारांशी या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांचा निकट संबंध असतो. हे कार्यकर्ते कुणाच्या मागे उभे राहतात हा निर्णायक महत्त्वाचा मुद्दा असतो. ज्या मतदारसंघात बहुसंख्यांक आदिवासी मतदार आहेत; अगर ज्या मतदार संघात बहुसंख्यांक मराठा मतदार आहेत त्या मतदार संघातून कधी मुस्लिम, कधी ब्राह्मण, कधी गुजराती असा उमेदवार निवडून येतो, याचे कारण हे आहे की मतदाराची जात आणि उमेदवाराची जात यापेक्षा मतदारांशी प्रत्यक्ष संबंध असणारा जो कार्यकर्ता तो कुणाच्या मागे उभा आहे, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.

जातिजमातींचा शह

निवडणुकांच्या राजकारणात वारंवार हे दिसून येते आहे की मुस्लिम मतदार हा एकतर मुस्लिम लीगच्या मागे असतो अगर काँग्रेसच्या मागे असतो. तूर्तास तो मोठ्या प्रमाणात इंदिरा काँग्रेसच्या मागे आहे. छोटे छोटे काही भाग सोडले तर एकूण मुस्लिम मतदारांत फारसा प्रवेश कम्युनिस्ट गाणि समाजवादी यांना नाही. आदिवासींच्यामध्ये हाच प्रकार आहे. आदिवासी आणि बंजारा मतदार काही तुरळक ठिकाणे सोडली तर काँग्रेसमागे असतो. दलित राजकारणाची हीच परिस्थिती आहे. ज्यांच्याबरोबर गायकवाड गट असतो, त्यांच्याविरोधी

।२१