या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
________________
अनिल नारायण कुलकर्णी माणूस जगण्यातलं आव्हान स्वीकारत जेंव्हा पुढं जात रहातो, तेंव्हा त्याच्या पावलापावलावर नवे अनुभव जगण्याची कला शिकवण्यासाठी उभे ठाकतात. त्यातच जर तो माणूस संवेदनशील असेल, तर त्याच्यातील संवेदना त्याच्या अनुभवांना कलात्मकतेची झालर लावून सर्जनशीलपणे कशी व्यक्त होते... याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री. अनिल कुलकर्णी यांची कविता. "वय माझे पाच हजार...' हा अशाच जगावेगळ्या अनुभवांतून सिध्द झालेला काव्याविष्कार आहे. त्यांच्यातील रसिकतेने, सकारात्मकतेने आणि हळव्या स्वभावाने जणू कविताच त्यांच्या प्रेमात पडली असावी...असं वाटायला लावणारा हा कवितासंग्रह काव्यरसिकांना निश्चितच भावेल. त्यांना कविता सुचत नसावी ती थेट त्यांना दिसत असावी... इतका साधा, रसळ, पण तितकाच विचार करायला लावणारा हा काव्य बहर रसिकांना निश्चितच लुभावेल यात तीळमात्र शंका नाही!
विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर खोपोलीतील पारखे उद्योग समुहाच्या पेप्को या कागद मिलमध्ये ज्युनिअर केमिस्ट म्हणून सुरू झालेली त्यांच्या कारकिर्दीची चढती कमान याच औद्योगिक क्षेत्रात कुरकुंभ येथील फायबर बोर्डस् लिमिटेडमध्ये प्रेसिडेंट पदापर्यंत पोहोचली. पूर्वपिढीचे संस्कार, एकत्र कुटुंबाची ताकद आणि जगण्यावर भरभरून प्रेम करण्याची वृत्ती या कविता संग्रहाच्या पानापानात अनुभवसिध्दपणे साकारली आहे. चतुरंगा प्रकाशन