पान:वनस्पतिविचार.pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

म्हणजे कमी होते, हे विसरता कामा नये. ह्यावरून बीजाच्या उगवत्या स्थितींत उपयोगी पडावे म्हणूनच अन्नाची सोय केली असते, ही सोय नैसर्गिक असते. खाली जाणारे अग्र हे आदिमूळ (Radicle) व वर वाढणारे टोंक हें प्रथम खोड ( Plumule) होय.

 एरंडीः-वरील कवची चकाकीत, रंगीबेरंगी चिटांप्रमाणे असून बुडाशी कांहीं भाग पांढरा, उंच असतो. कवची जाड व कठीण असते. पांढऱ्या उंच जागेमध्ये पावट्याप्रमाणे बीजछिद्र ( Micropyle) असते. चार पांच दिवस एरंडी भिजवून ठेविली असतां ती फुगते. कवची काढून टाकिली म्हणजे आंत पांढरें आवरण आढळते. हे आवरण जाड व तेलकट असते. हळू हळू हें तेलकट आवरण काढून टाकावे म्हणजे मध्यभागांत कागदाप्रमाणे पातळ, सफेद दोन डाळिंबी आढळतात. डाळिंबीच्या बुडाशी मध्यभागी वाढता कोंब आढळतो. कोंबाचे एक अग्र बीजछिद्रांतून खाली बाहेर पडते, व दुसरें अग्र पांच सहा दिवस तसेंच बीजदलांनी आवरीत राहते. जाड तेलकट आवरणांतील तेल कमी होऊन आंतील पातळ बीजदले मोठी होऊ लागतात. वाढता वाढत तेलकट भाग नाहीसा होऊन पातळ डाळींबी मोठ्या वाढून हिरव्या होतात. म्हणजे बीजदले वाढून पहिली हिरवी पाने कोंबावर दिसूं लागतात. |

 बीजदलें ( Cotyledons ) व आदिमूल (Radicle ) ह्यांमध्ये एक लांब दांडा येतो. हा दांडा बीजदलाखाली आदिमुळाचे वरचे बाजूवर असतो. ह्या दांड्यामुळे बीजदले, त्यावरील तेलकट वेष्टण व मध्यभागी असणारा कोंब हे वर उचलले जातात. जेव्हां खोड चांगले वाढते तेव्हा हा मध्ये आलेला दांडा खोडाचा एक भाग होतो. असला मध्यभागी येणारा दांडा पावट्यामध्ये इतका मोठा वाढत नाहीं.

 पावट्याचे डाळिंबीत पौष्टिक अन्न असते, पण एरंडीचे डाळिंबीत पौष्टिक अन्न नसून डाळिंबीच्या सभोवती जें तेलकट वेष्टण आढळते, तेच एरंडचें अन्न होय. एरंडी उगवू लागली असतां, हे अन्न कमी होऊन अगदी निःसत्त्व होते. एरंडी सुद्धा द्विदल धान्यवनस्पति वर्गापैकी आहे.

 अन्नाच्या आवरणासंबंधीं जो फरक एरंडी व पावटा ह्यामध्ये असतो तो विशेष लक्षात ठेवण्याजोगा आहे. पुष्कळ बीजांत पहिल्याप्रमाणे अन्न बीज-