पान:वनस्पतिविचार.pdf/34

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
     वनस्पतिविचार,     [ प्रकरण
-----

'प्रथम तरतूद व नंतर उत्पत्ती' असा सृष्टिनियम ठरलेला आहे. तदनुरूप वनस्पति व प्राणि या दोहोंची परंपरा दिसते.

 तसेच भूगर्भ शास्त्रवेत्ते म्हणतात की, हृल्ली वातावरणांत जे कार्बन आम्लवायूचे सूक्ष्म प्रमाण आढळते, ते प्रमाण पूर्वी एका काळी फार अधिक होते. त्या काळी वनस्पति फार जोमाने वाढून त्यांचा विस्तार हल्लींपेक्षा फार मोठा असे, पूर्वी जोमाने वाढलेल्या वनस्पति कालगतीने जमिनीत पुरल्या जाऊन त्यांवर वजनदार खनिज पदार्थांचे दडपण पडल्यामुळे त्यांचे खाणीत सांपडणारे दगडी कोळसे तयार झाले. दगडी कोळसे केव्हा तयार झाले, हे जरी ठाम सांगता येत नाही, तथापि त्यांच्या उत्पत्तीचा काल फारच प्राचीन असावा ह्यात संशय नाही. ज्या कालीं कार्बन आम्लवायूचे प्रमाण वातावरणात अधिक होते, तो काल प्राणिवर्गाच्या जीवनसूत्रास प्रतिकूल असला पाहिजे. कारण प्राणिवर्गाची जीवनसूत्रे कार्बन वायूमध्ये चांगली चालत नाहीत; पण उलटपक्षी तो वायु वनस्पतीस फार हितावह असल्यामुळे त्यांची वाढ त्या काळीं अधिक जोमाची होती.

 यावरून एवढे खास म्हणता येईल की, वनस्पतींच्या अनुकूल कालांत प्राणिवर्गाची प्रगति फार कमी असून त्यांचे अस्तित्वही फार थोड्या प्रमाणात असावे असे ठरते, तसेंच जर प्राणिवर्गाचे अस्तित्व त्यावेळी फार थोडे होते, तर असें कां म्हणू नये, की प्रथम वनस्पतिवर्ग अस्तित्वात येऊन तिच्या अनुकूल कालांत त्या वर्गाची वाढ अतिविस्तृत झाली, व त्याबरोबरच नुकती कोठे प्राणिवर्गाच्या अस्तित्वास सुरुवात झाली होती. सारांश, वनस्पतिवर्ग प्रथम अस्तित्वात येऊन मागाहून प्राणिवर्ग उत्पन्न झाला असे म्हणता येईल.

 उत्कांतिनियमानुसार प्रथम साधी व सरळ सृष्टि उत्पन्न होऊन नंतर त्यांत कमी-अधिक फरक होत गेले. फरक होत असतांना क्रमाक्रमाने आश्चर्यकारक संकीर्णता सृष्टिरचनेत येत गेली. या सिद्धतत्वाप्रमाणे वनस्पतिकोटी प्राणिकोटीपेक्षां प्रथम निर्माण झाली असली पाहिजे. कारण प्राणिवर्गापेक्षां वनस्पतिकोटी साधी व सुलभ रचनेची आहे. प्राणिकोटीमध्ये अधिक दुर्गम व संकीर्णरचना दृष्टीस पडते, म्हणून प्राणिवर्गाची उत्पति नतर झाली असावी.