पान:वनस्पतिविचार.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१५२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

होतात. त्यामध्ये मूळ अस्सल गुण राहतील किंवा नाही ह्यांची शंका असते. जेथे जेथे पुंकेसर अथवा स्त्रीकेसरकोश लुप्त होत जातात, त्या त्या वनस्पतींत नैसर्गिक कलमें होऊन त्या वनस्पतीचा वंश वाढविला जातो. जसे, जाई, जुई, मोगरा वगैरे. जाईचे कलम आपोआप होत असते. फांदीच्या सांध्यापाशी मुळे सुटून जमिनीत घुसतात, व ह्या रीतीने पुष्कळ स्वतंत्र रोपे होतात.

 बहुदलधान्य वनस्पतींत फुलामध्ये वर्तुळाची मांडणी फिरकीदार असते. ह्यामध्ये फुले एकलिंगी असतात, म्हणजे केवळ पुंकेसर अथवा स्त्रीकेसर फुले असतात. दोन्हीं स्त्रीपुरुपतत्त्वे एकाच फुलांत असत नाहींत. सुरु, देवद्वार वगैरे उदाहरणे बहुदल-धान्य-वनस्पतीपैकी आहेत, अननसांमध्ये फुलांची मांडणी वरीलप्रमाणेच असते. देवद्वाराचें फळ शंकाकृती असून त्यांची स्त्रीकेसरदलें, फळ वाळल्यावर लांकडी होतात. प्रत्येक स्त्रीकेसरांवर दोन बीजें असतात. येथे बीजें उघडी असून आतील भागी त्यांचा संबंध स्त्रीकेसरांशी असतो. एकदल अथवा द्विदल वनस्पतीमध्ये नेहमीं बीजें स्त्रीकेसर-दलानीं आच्छादित असतात. पण बहुदलधान्य वनस्पतीमध्ये बीजें आच्छादित नसून उघडी राहतात. हा फरक अगदी स्पष्ट असतो. ह्यामुळे सपुष्प वर्गाचे दोन मुख्य भेद केले आहेत.
 फुलांतील चारी वर्तुळे ज्यावर असतात त्यासं पुष्पाधार ( Thalamus ) म्हणतात. जेव्हां फुलांत देंठ असतो, अशा वेळेस देंठाचे अग्र म्हणजे टोंक हेच पुष्पधार बनते. जेव्हां देठ असत नाहीं, तेव्हां ज्यांवर ती वर्तुळे आढळतात, त्यांसच पुष्पाधार म्हणतात. फुलांच्या वर्तुळाप्रमाणे पुष्पाकार ही निरनिराळ्या आकाराचे असतात. वाटोळ्या, पसरट, शंक्वाकृती, पेल्यासारखा, उभ्या नळीप्रमाणे असे आकार पुष्कळ वेळां पाहण्यांत येतात. स्ट्राबेरी अथवा तुतींमध्ये पुष्पाधार शंक्वाकृती असतात. गुलाबांत पुष्पाधार पेल्यासारखा खोलगट असतो. सुर्यकमळांत तो पसरट व रुंद असतो. अंजीर, पिंपळ, वड वगैरेमध्ये जी फळे म्हणून समजण्यांत येतात, त्यांचा बाह्य भाग हा पुष्पाधार असतो. फळ पिकल्यावर तो भाग मऊ होऊन खाण्यांत त्याचाच उपयोग होतो. उंबराच्या फळांचा बाह्य तांबडा भाग पुष्पाधारच आहे. ही फळे कापून पाहिली असतां आतील भागास लहान लहान फुलें दृष्टीस पडतील.