पान:वनस्पतिविचार.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१३६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

कमी अधिक तफावत दिसते. फाजील अन्नग्रहण अथवा उपोषण वनस्पतीस होऊ लागले असता, त्याचा परिणाम केवळ बाह्य रूपांवरच न दिसतां अंतर्व्यवस्था व तेथील कार्ये ह्यांवरही होत असतो. शुद्ध ऑक्सिजन वायु कमी मिळू लागला असतां सेंद्रियपदार्थोद्भुत शक्तीचा जोर कमी होऊ लागतो. ह्या संबंधी अंतरफेरबदल व तदनुषंगिक कार्ये पूर्वी वेळोवेळी सांगण्यांत आली आहेत. अमूक एक विशिष्ट उष्णता वनस्पतीस हवी असते. त्यापेक्षां अधिक अगर कमी मिळाली असतां वनस्पतीची वाढ कमी अधिक होते. कडक उष्णता अथवा उष्णतेचा अभाव झाला असतां वनस्पतीची वाढ ख़ुटून जाते, व पुढे तीच स्थिति राहिली तर वनस्पती मरून जाते. विशिष्ट उष्ण हवेत अथवा सूर्यप्रकाशांत वनस्पती जोमाने उगवते. खरोखर ह्या विशिष्ट उष्णतेचे योगाने वनस्पति वाढीस एक प्रकारचे उत्तेजन मिळते. असे उत्तेजन बाह्य स्थितीप्रमाणे वनस्पतीस नेहमी मिळत असते, व त्या उत्तेजनानुसार वनस्पतीकडून प्रत्युत्तरही देण्यात येते. जी गोष्ट उष्णतेसंबंधी खरी, तीच गोष्ट हवेच्या फरकाविषयी असते. ह्मणजे विशिष्ट हवेत जिवनकणास विशिष्ट उत्तेजन मिळून त्याचे प्रत्युत्तर वनस्पतीच्या आरोग्यावर होत असते.

 जीवनपदार्थांचा ठराविक उद्देश असल्यामुळे उत्तेजनांतील दोष नाहींसे करून सजीव-तत्त्व-परिस्थितीप्रमाणे उत्तेजित जीवनक्रिया चालविते. आपला एखादा अवयव आंखडून अथवा लांब करून बाह्य उतेजन व्यक्त न करितां निराळ्या रीतीने हळू हळू त्याचे दिक्दर्शन वनस्पति करित असते. आता लाजाळू अथवा डायोनिया वगैरे वनस्पती अशा नियमास अपवाद आहेत. कारण लाजाळूस स्पर्श केला असतां पाने गळून एकमेकांवर पडतात. तसेच डायोनिया मांसाहारी असल्यामुळे भक्ष्याचा स्पर्श झाला कीं, पाने उत्तेजित होऊन भक्ष्यास सुटून जाऊ देत नाहीत. अशा ठिकाणी स्पर्श-बाह्य-उत्तेजन होय. खरोखर वनस्पतीची परिस्थिति वेळोवेळी भिन्न भिन्न होत असते. जमिनीमध्ये मुळ्या पसरलेल्या असून हवेमध्ये फांद्या व पाने असतात. जमिनीतील परिस्थिति उष्णतेसंबंधी फारशी बदलत नसून पाण्याचे प्रमाण भिन्न भिन्न थरावर भिन्न भिन्न असते. हवेमध्ये मात्र उष्णता सारखी बदलते. तसेच वनस्पतीच्या कांहीं भागाची परिस्थिति ज्यास्त बदलत असते व कांहीं साधारणपणे थोडा वेळ कायम असते. अशा परिस्थितीत वनस्पतीस मिळणारे उत्तेजन