पान:वनस्पतिविचार.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१६ वे ].    उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा.    १३७
-----

भिन्न भिन्न असते. एकाच जागी दोन वनस्पति जरी असल्या, तरी दोहींस निरनिराळे उत्तेजन मिळेल. इतकेच नव्हे तर एकाच वनस्पतीच्या निरनिराळ्या भागास ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे वेगळे उत्तेजन मिळते. तसेच हवेमध्ये वाढणाऱ्या खोडादि भागांस दिवसा व रात्री वेगळे उत्तेजन मिळून, त्याप्रमाणे प्रत्युत्तरही वेगळे असते.

 पावट्याच्या जातींतील पुष्कळ झाडावर बाह्यउत्तेजनाचा परिणाम चांगला पाहण्यास आढळतो. सूर्यप्रकाशांतूनही झाडे अंधेरांत नेऊन ठेविली असतां पाने लागलीच गळतात, व पुनः सूर्यप्रकाशांत अंधारांतून आणिली असतां पूर्वीप्रमाणे सतेज दिसू लागतात. अंधारात येणारी ग्लानि सूर्यप्रकाशांत नाहींशी होते. प्रकाश व अंधकार ह्यांचा परिणाम वनस्पतीवर उत्तेजनात्मक होत असतो, व ह्याचे मोठमोठे चमत्कार पाहण्यांत येतात. वरचेवर प्रकाशांतून अंधारात अथवा उलट अंधारांतून प्रकाशांत वनस्पति आणिली असतां, कांहीं चमत्कार दिसुन पुढे तेच कमी कमी होत जातात. पुष्कळ वेळां वनस्पति रात्री आपली पाने एकमेकांवर रचून जणू झोपी गेली आहे असे वाटते, व पुनः सकाळी ती पाने जागी होऊन आपलें नित्यकर्म सुरू कृरितात. रात्री एकमेकांवर रचण्याने त्यांचे संरक्षण होऊन विश्रांतीही मिळते. विशेषेकरून संयुक्त पानांत असले चमत्कार नेहमी दृष्टीस पडतात.

 कोवळ्या स्थितीत वनस्पतीच्या पानांमध्ये निरनिराळी गति दृष्टीस पडते. याचे कारण पाने वाढत असतां दोन्ही बाजू सारख्या वाढत नाहींत. दोन्हीं बाजूच्या पेशींमध्ये निरनिराळे ताण असल्यामुळे हे चमत्कार घडतात. ज्या बाजूला अधिक ताण असतो, ती बाजू प्रथम वाढते; पण लवकरच दुसऱ्या बाजूकडील पेशी तणाणू लागतात व वाढ त्या बाजूकडे होऊ लागते. या प्रमाणे वाढीची दिशा एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे वळत जाते. असले वाढीचे प्रकार पानाच्या देठामध्येही आढळतात. पाने जुनी झाली असता, देठाचे बुडी जो सुजवटा येतो, तो फिरल्यामुळे पानास गति मिळते. ह्या सुजवट्यामधील पेशी समपरिमाणी असून दोन्ही बाजूकडील पेशी एक झाल्यावर तणाणू लागतात. त्यामुळे पान एकदां पडून पुनः उभे ताठते. पाने वाढतांना जी गति दिसते, त्यापेक्षा अशा ठिकाणी ही गति अधिक वेळ टिकते.