पान:वनस्पतिविचार.pdf/161

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५ वे ].    पचन, वाढ व परिस्थिति.    १३३
-----

पेशी तणाणली असतां नवीन कण भित्तिकेवर जमून किंवा भित्तिकेच्या रंध्रांत बसून ती जाड व रुंद होत जाते, म्हणजे पेशांची वाढ होते.

 चवथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोकळी हवा अथवा हवेतील शुद्ध ऑक्सिजन वायू वाढत्या कोंबास मिळणें जरूर असते. ऑक्सिजन वायूचा परिणाम पोषक सेंद्रिय पदार्थांवर होऊन त्यापासून उत्तेजितशक्ति पेशी-घटनात्मक कार्यास मिळते. ह्याच वायूमुळे पेशी-घटक-द्रव्ये जीवनकण-घटकावयवांतून तयार होतात. ह्या दृष्टीने ऑक्सिजन वायूचीं वनस्पति किंवा प्राणी, ह्या दोन्हींच्या जीवन-क्रमांत अत्यंत जरूरी असते. हा वायु म्हणजे प्राणवायु होय,

 ह्या चारही गोष्टींची अनुकूल स्थिति असली म्हणजे अधिक जीवनकण तयार होऊन अधिक पेशी उत्पन्न होतात. मुळांची, खोडांची अथवा पानांची वाढ ह्याच रीतीने होते. जीवनकण अधिक होऊन पेशी द्विधा होतात व पुढे त्यास दीर्घ कायम स्वरूप मिळून मुख्य अवयव वाढतो. मुळाची वाढ खोडापेक्षा साधी असते. खोडाची वाढ म्हणजे त्याच्या वाढत्या कोंबाची तसेच अंतरकांड्याची वाढ असते. मुळे किंवा खोड जाड व रुंद होणे त्याच्या अंतरसंवर्धक पदावर अवलंबून असते. संवर्धक पदराची जशी कमी अधिक तीव्रता त्यामाणे कमी अधिक वाढ होत जाते. पानाची वाढ नेह्मीं अग्राकडे तसेच बाजूकडे सारखी असते, असें नाहीं. पुष्कळ वेळां बाजूकडील वाढ प्रथम होऊन नंतर अग्रांकडील बाजू वाढू लागते, फर्न वनस्पतीचे पान अग्रांकडे गुंडाळलेलें असते. प्रथम बाजू वाढून नंतर अग्र वाढते. ह्याचे कारण पानाच्या कोवळ्या स्थितीत पेशीचे तणाणणे व त्यामुळे होणारी वाढ ही दोन्ही पोटांकडील बाजूपेक्षां पाठीकडील बाजूंत जास्त आढळतात, नाही तर दोन्ही बाजूकडील वाढ सारखी झाली असती, म्हणून अग्र दीर्घ होऊन गुंडाळते.

 कोवळ्या स्थितींत वाढीवर फारच लवकर परिस्थितींचा परिणाम होतो, व परिस्थितीप्रमाणे उत्तेजन व प्रत्युत्तर दिले जाते. वाढत्या प्रदेशांत पेशीच्या निरनिराळ्या तणाणण्याप्रमाणे पेशीच्या वाढीवर फरक होतो. तणाणण्याचा जोर उभा व आडवा असतो. तसेच वाढ सुद्धा उभी व आडवी असते. परिस्थिती भिन्न असल्यामुळे वनस्पतींच्या अंतर अथवा बाह्य रचनेत सुद्धां फरक डोतो, पाणवनस्पति व जमिनीवरील वनस्पती ह्यांत पुष्कळ फरक असतो.