पान:वनस्पतिविचार.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२ वे ].    बाष्पीभवन (Transpiration.)    १०३
-----



बाष्पीभवन अधिक होण्यास मदत करतात. आतां ही गोष्ट खरी की, पावसाळ्यांत बाष्पीभवन अधिक होते, कारण जमिनीत पाण्याचा पुरवठा चांगला असतो. त्यामुळे मुळांतून मुबलक पाणी वर चढून त्याचा परिणाम ऐंद्रिय पदार्थ अधिक प्रमाणांत तयार करण्यात येतो. शुष्क दिवसांत बाष्पीभवन जितके कमी होईल तितके चांगले, व ते कमी होण्यास नैसर्गिकही थोडी अधिक मदत मिळते. शुष्क व कोरड्या प्रदेशांत झाडांची पाने अगदीं अरुंद असतात व त्यामुळे त्यांतून बाष्पीभवन कमी होते.

 ज्यावेळेस ऐंद्रिय पदार्थ पुष्कळ बनत असतात, तसेच त्या कामाकरितां अधिक बाष्पीभवन होत असते, अशा वेळेस त्वचारंध्रे (Stomata ) उघडी व रुंद होतात. त्यांचा उद्देश होतां होईल तों वाफ त्या रंध्रांतून लवकर निघून जावी. पण जमीन व हवा अधिक शुष्क व कोरडी असतां त्वचारंध्रे उघडी न राहता बंद होऊ लागतात, व त्यामुळे बाष्पीभवन कमी होते. बाह्य त्वचेतील ( Epidermis ) दोन द्वाररक्षक ( Guard-cell ) पेशीमध्ये त्वचारंध्र ( Stoma ) उत्पन्न होते. मध्यभागी रंध्र असून द्वाररक्षक पेशी बाजूस चिकटलेल्या असतात. मध्यभागाकडे द्वाररक्षक पेशीस खाचेसारखा आकार असून बाह्य बाजूस फुगलेल्या असतात. जेव्हां बाष्पीभूत पाणी द्वाररक्षक पेशींत शिरू लागते, त्या वेळेस त्या सरळ फुगून एकमेकांपासून जरा अलग होतात. त्यामुळे मध्यभागी असलेलें रंध्र अधिक रुंद होते. द्वाररक्षक पेशींत पाणी कमी झाले असतां पूर्वीप्रमाणे पेशी एकमेकांस लागून रंध्र लहान व आकुंचित होते. अनुभवांती असे ठरले आहे की, जेव्हां पुष्कळ पाणी द्वाररक्षक पेशीत शिरते, त्यावेळेस त्वचारंध्रे रुंद होतात, व पाणी कमी असतां त्वचारंध्रे अरुंद होतात. ह्यामुळे जेव्हां पुष्कळ पाणी जमिनीत असून बाष्पीभवनामुळे ते द्वाररक्षक पेशीमध्ये येते, त्यावेळेस त्वचारंध्रे रुंद होऊन ते पाणी बाहेर हवेत मिसळते; पण पाण्याचा अभाव जमिनीत झाल्याबरोबर बाष्पीभवनही कमी होते व ते साधण्याकरितां त्वचारंध्रे सुद्धा प्रकाश असतांनाही संकुचित होतात. खरोखर त्वचारंध्रे बंद होणे अथवा उघडी राहणे, हे वनस्पतीच्या गरजेप्रमाणे व सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे घडत असते. त्वचारंध्रे अरुंद झाली असतां थोड्या पाण्यावर वनस्पति आपला निर्वाह करू शकते. अशावेळी