पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

आहे. युरोपातील देशात यासंबंधीचा ब-यापैकी मोकळेपणा आला आहे. त्यामुळे तिथे उभय संमतीने प्रकटपणे, सार्वजनिक ठिकाणीही चुंबन घेणे,आलिंगन देणे-घेणे शिष्टसंमत व्यवहार होऊन गेला आहे. आपल्याकडे विवाहपूर्व व विवाहोत्तर योनीशुचितेचा जो बाऊ केला जातो, तसा तिथे केला जात नाही. विवाहपूर्व व विवाहोत्तर संबंध तिथे गृहीत आहेत. आपल्याकडे तसे नसल्याने मतिमंदांतील लैंगिक व्यवहार व त्यांच्या परिणामांची काळजी घेतली जाते.
 मतिमंदांच्या इतकेच सामान्यांच्या संबंधातील लैंगिक व्यवहाराबद्दल जोवर आपण उदार होणार नाही, तोवर या संबंधीचा उभा केलेला बागुलबुवा कमी होणार नाही. लैंगिक शिक्षण-प्रशिक्षणांच्याअभावी आपल्याकडे हे सारे प्रश्न निर्माण झाले आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. यातील भयगंड हा बराचसा अज्ञान व नैतिकतेच्या अत्याधिक बंधनातून निर्माण झाला आहे. आपणाकडे गुप्तांग दर्शन-योनी वा शिश्न दिसणे, दाखवणे शिष्टसंमत नसल्याने त्याबद्दल गैरसमज व भय निर्माण झाले आहे. आचार्य रजनीशांनी म्हणूनच घरातील प्रासंगिक नग्नतेचे समर्थन केले होते. आपल्या या व्यवहारामुळे सर्वसामान्यात मोठे ताण-तणाव निर्माण होतात. मतिमंदांत याचे प्रमाण अनावश्यक दमनामुळे अधिक असते. त्यामुळे आपणाकडे असा एक गैरसमज आहे की, सामान्यांपेक्षा मतिमंदांत लैंगिक भावना तीव्र असते. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. लैंगिक व्यवहार प्राण्यात जैव शारीरिक' (बायोफिजिकल) स्वरूपाचे असतात. तर मनुष्यात त्याचे रूप ‘मन लैंगिक' (सायको सेक्शुअल) असते. या शब्दात माणसातील कामुकतेचा संबंध शारीरिक जसा असतो, तसा तो मानसिकही असतो. शिवाय त्याला प्राण्यांमध्ये असतो तसा ऋतुकाळ (सेक्स सीझन) असत नाही. एका अर्थाने मनुष्य सर्ववेळ कामुक असतो. ही कामुकता इतर वेळी सुप्त असते. उत्तेजक वस्तू, व्यक्ती, व्यवहाराने ती तीव्र होते वा प्रकट होते. हे लक्षात घेता याची नियंत्रण क्षमता मतिमंदांना लैंगिकतेसंबंधी शिष्टसंमत वर्तन, सभ्य व्यवहाराची शिकवण न दिल्याने विचित्र प्रसंग निर्माण होतात. मतिमंद मुले-मुली परक्यांकडे लगट वा सलगी करतात. उत्तेजक स्पर्श करतात. कुरवाळतात, हस्तमैथुन करतात. नको तेव्हा नको तिथे निर्वस्त्र होणे, गुप्तांगाचे प्रदर्शन करणे अशा हरकती, चाळे मतिमंद ‘सहज क्रिया' म्हणून करतात. कामुक वळवळ मतिमंदांत अधिक असते, याचे कारण कामभावना शमविण्याची त्यांना संधी उपलब्ध होत नाही. त्यांना मित्र-मैत्रिणी असत नाहीत. शाळेत याबाबत शिक्षक काळजीने अत्याधिक दक्ष असल्याने बंधनांची प्रतिक्रिया म्हणून, दमन विरोधाचा भाग म्हणून मतिमंद अधिक कामुक क्रियाशील

वंचित विकास जग आणि आपण/५२